सहशहर अभियंता राजन पाटील यांची माहिती

पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या अतिक्रमणांची उशिरा का होईना, महापालिका प्रशासनाने दखल घेतली आहे. शहरातील अतिक्रमणे झालेल्या ठिकाणांची माहिती एकत्रित करण्यात येत असून त्यानुसार मुख्यालयाच्या नियंत्रणाखाली दररोज कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

खास अतिक्रमण विभागासाठी नियुक्त केलेल्या सहशहर अभियंता राजन पाटील यांनी याबाबतची माहिती दिली. संपूर्ण शहरात अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. महापालिका प्रशासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्यामुळे शहराचा विचका झाल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाल्याची वृत्तमालिका ‘लोकसत्ता’ने ठळकपणे प्रसिद्ध केली, त्या पाश्र्वभूमीवर पाटील यांनी पालिकेची भूमिका मांडली. अलीकडेच अतिक्रमण विरोधी पथकाची जबाबदारी सोपवण्यात आलेले पाटील या संदर्भात म्हणाले की, शहरात आतापर्यंत मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, ती काढण्यात येणार आहेत. त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत होणारी कारवाई निरस्त करण्यात आली आहे, त्याचे एकत्रित नियंत्रण मुख्यालयाकडे राहणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या, हातगाडय़ा, होर्डिग, फ्लेक्स आदी सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर मुख्यालयाद्वारे कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी सतीश इंगळे, मकरंद निकम आणि श्रीकांत सवणे या तीन अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक अभियंत्याने एकेक महिना आलटून-पालटून सर्व क्षेत्रीय कार्यालयात अतिक्रमण विरोधी कारवाईचे नेतृत्व करायचे आहे, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जून महिन्यात इंगळे, जुलै महिन्यात निकम आणि ऑगस्ट महिन्यात सवणे यांच्याकडे जबाबदारी राहणार आहे.

Story img Loader