केवळ पंधरा मिनिटांत सुमारे ८ हजार २०० चौरस फुटांचा परिसर निर्जंतुक करणाऱ्या ‘युव्ही सॅन’ या यंत्राची निर्मिती पुण्यातील ‘पॅड केअर लॅब’ या नवउद्यमीने केली आहे. केवळ आठ दिवसांत हे यंत्र तयार करण्यात आले आहे. रुग्णालये निर्जंतुक ठेवण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरणार असून, आता त्याची निर्मिती सुरू करण्यात आली आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करण्यात येत आहे. त्यात नवउद्यमी महत्वाची भूमिका निभावत आहेत. संशोधन करून चाचणी किट, संसर्ग रोखण्यासाठीचे साहित्य तयार केले जात आहे. त्याबरोबरच निर्जंतुकीकरण हा घटकही महत्वाचा आहे. त्यासाठी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) व्हेंचर सेंटर या इन्क्युबेशन सेंटरमधून उभ्या राहिलेल्या पॅड केअर लॅब या नवउद्यमीने संशोधन करून आठ दिवसांत युव्ही सॅन हे यंत्र तयार केले आहे. वीजेवर चालणाऱ्या या यंत्रातील अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे आजुबाजूचा परिसर निर्जंतुक करणे शक्य झाले आहे.

युव्ही सॅन या यंत्राची माहिती पॅड केअर लॅबच्या अक्षय धारियाने लोकसत्ताला दिली. “काही काळापासून ही कल्पना मनात होती. मात्र, करोना विषाणू संसर्ग वाढत असल्याने आम्ही तातडीने काम सुरू करून संशोधन आणि निर्मिती प्रक्रिया सुरू केली. युव्ही तंत्रज्ञानाचा वापर करून युव्ही सॅन विकसित करण्यात आला आहे. पंधरा मिनिटांमध्ये ८ हजार २०० चौरस फूटाचा परिसर निर्जंतुक करता येऊ शकतो. या यंत्राची वैधता तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. एका रुग्णालयाला हे यंत्र देण्यात आले असून, आणखी काही रुग्णालयांनी याची मागणी नोंदवली आहे. त्यांना पुढील काही दिवसांत याचा पुरवठा केला जाणार आहे. या प्रकारच्या अन्य यंत्रांच्या तुलनेत युव्ही सॅनच्या निर्मितीची किंमत जास्त किफायतशीर आहे,” असे अक्षय धारिया यांनी सांगितले.

Story img Loader