वाकडच्या नगरसेविका ममता गायकवाड यांना उमेदवारी; महापौर नितीन काळजे यांचे ‘राजीनामानाटय़’; शीतल शिंदे, राहुल जाधव यांचे सदस्यपदाचे राजीनामे

पिंपरी महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून शनिवारी सत्तारूढ भाजपमध्ये प्रचंड उलथापालथ झाली. स्पर्धेतील मुख्य दावेदारांची नावे बाजूला सारून अनपेक्षितपणे ममता विनायक गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्याने पक्षात नाराजीचा सूर उमटल्याने बऱ्याच नाटय़मय घडामोडी झाल्या. आमदार महेश लांडगे समर्थक राहुल जाधव यांना डावलण्यात आल्याने भोसरी मतदारसंघातील भाजप नगरसेवकांनी एकजूट दाखवत आक्रमक पवित्रा घेतला. नितीन काळजे यांनी महापौरपदाचा तर जाधव यांनी स्थायी सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने भाजप वर्तुळात खळबळ उडाली. भाजपमधील अंतर्गत वादळाचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत भाजपला आव्हान दिले आहे.

स्थायी अध्यक्षपदासाठी बुधवारी (७ मार्च) निवडणूक होणार आहे, त्यासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. यानिमित्ताने आतापर्यंत पडद्यामागे होत असलेल्या घडामोडींचा प्रत्यय दुपारी दोन वाजल्यापासून पालिका मुख्यालयात आला. ममता गायकवाड यांचे पती व माजी नगरसेवक विनायक गायकवाड मोठय़ा संख्येने समर्थकांसह पालिकेत दाखल झाले, तेव्हाच अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. जुन्या गटाकडून शीतल शिंदे आणि लांडगे गटाकडून जाधव यांची नावे अंतिम स्पर्धेत होती, त्यापैकी एकाला संधी मिळेल, असे वातावरण असताना ममता गायकवाड यांना उमेदवारी मिळवून देत शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी धक्कातंत्राचा वापर केला, त्यामुळे नाराजीनाटय़ सुरू झाले. या परिस्थितीची पूर्वकल्पना असल्याने जगताप पालिकेत तळ ठोकून बसले. दबावतंत्राचा भाग म्हणून महापौरांनी शहराध्यक्षांकडे तर राहुल जाधव यांनी पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे राजीनामा दिला. नाराज शीतल शिंदे यांनीही तोच पवित्रा घेतला. आमदार महेश लांडगे शहरात असूनही पालिकेत फिरकले नाहीत.

या सर्व घडामोडींमुळे तणावपूर्ण शांततेचे वातावरण होते. थोडय़ा वेळानंतर वातावरण निवळले. गायकवाड यांचा अर्ज दाखल करताना महापौरांनी हजेरी लावली. जगतापांनी महापौरांना बोलावून एकत्रित पत्रकार परिषद घेत कोणीही राजीनामा दिला नाही, असा दावा करत सर्व काही आलबेल आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापौर तसेच जाधव, शिंदे यांची नाराजी लपवता आली नाही. योग्य वेळी उत्तर देऊ, असे सूचक विधान महापौरांनी केले. तोपर्यंत गायकवाड समर्थकांनी भाजपचा विजय असो, लक्ष्मण जगतापजिंदाबादच्या घोषणा देत पालिका परिसर दणाणून सोडला. आता बुधवारी होणाऱ्या घडामोडींकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

लांडगे गटाच्या बंडाळीवर राष्ट्रवादीचे विजयाचे गणित

भाजपमधील संभाव्य बंडाळीची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादीने ‘लक्ष्मीपुत्र’ मोरेश्वर भोंडवे यांना रिंगणात उतरवले. शिवसेनेनेही तातडीने पाठिंबा देत राष्ट्रवादीला थोडेसे बळ दिले. भोंडवे यांचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीचा कोणी मोठा नेता नव्हता. मात्र, शिवसेना व मनसेचे शहरप्रमुख आवर्जून उपस्थित होते. स्थायी समितीत १६ पैकी ११ सदस्य भाजपचे असून राष्ट्रवादीचे चार व शिवसेनेचा एक सदस्य आहे. अकरा विरूद्ध पाच असे सध्याचे संख्याबळ आहे. लांडगे गटाने बंडाळीचा निर्धार कायम ठेवल्यास भाजपला धोका होऊ शकतो. अन्यथा, थेट लढतीत भाजप विजयी होण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

  • पक्षाचा आदेश पाळू, पक्षहितासाठी काहीही करू – नितीन काळजे, महापौर
  • पक्षात नाराजी नाही, असल्यास ती दूर करू – एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते
  • राष्ट्रवादीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, आम्हीजिंकू – प्रशांत शितोळे, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी
  • राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा राहील – राहुल कलाटे, शहरप्रमुख, शिवसेना

Story img Loader