जेष्ठ साहित्यिक ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे (वय-78) यांचे अल्पशा आजाराने आज(दि.26 एप्रिल) सकाळी ८ वाजता  पुण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘झुलवा’कार म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध झालेले उत्तम बंडू तुपे  यांचा जन्म १ जानेवारी १९४२ रोजी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या ‘एनकूळ’ या गावी झाला होता.

तब्बल १६ कादंबऱ्यांसह अनेक लघुकथांना शब्दरूप देणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची ‘झुलवा’ ही कादंबरी विशेष गाजली. यामुळेच त्यांना झुलवाकार नावाने ओळखले जात होते. याचबरोबर कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाल, झावळ आणि माती या कादंबऱ्या देखील विशेष गाजल्या आहेत. तर ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार मिळाला आहे. त्याच बरोबर ‘काट्यावरची पोट’ या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमय पुरस्कार मिळाला.  त्यांचा जीवन प्रवास अखेर पर्यंत खडतर राहिला.  मागील अनेक महिन्यापासून  ते आजारी होते.

ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी तुपे यांच्या ‘झुलवा’ कादंबरीवर आधारित नाटक रंगभूमीवर आणले होते. त्यात अभिनेते सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी भूमिका केल्या होत्या. १९९७ साली जळगावमध्ये भरलेल्या कामगार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना अण्णा भाऊ साठे पुरस्कार, तसेच त्यांना राज्य पुरस्कार मिळाला होता.

उत्तम बंडू तुपे यांचे लेखन –

इजाळ (कादंबरी), खाई (कादंबरी), खुळी (कादंबरी), चिपाड (कादंबरी), झावळ (कादंबरी), झुलवा (कादंबरी), भस्म (कादंबरी), लांबलेल्या सावल्या (कादंबरी), शेवंती (कादंबरी), संतू (कादंबरी), आंदण (लघुकथा संग्रह), पिंड (लघुकथा संग्रह), माती आणि माणसं (लघुकथा संग्रह), कोबारा (लघुकथा संग्रह), काट्यावरची पोटं (आत्मचरित्र)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jhulwakar uttam bandu tupe passes away msr 87 svk