खडकवासला धरणसाखळीतील धरणांच्या पाणीसाठय़ात दररोज काही प्रमाणात वाढ सुरू असून, शनिवारी चारही धरणांमध्ये मिळून साडेसोळा टीएमसीहून अधिक (अब्ज घनफूट) उपयुक्त पाणीसाठा होता. दिलासादायक बाब म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत या धरणांमध्ये साडेसात टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. मात्र, पुणे शहराला महिन्याला दीड टीएमसी पाणी लागते. त्यामुळे पुण्याचे पाणी, शेतीसाठीचा वापर व बाष्पिभवन लक्षात घेता अजूनही वर्षभराचा पाणीसाठा धरणात जमा झालेला नाही.
पुण्याला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासला धरणाच्या क्षेत्रामध्ये जोरदार पावसाने ओढ दिली असली तरी तुरळक पाऊस पडतो आहे. त्यामुळे धरणांच्या साठय़ामध्ये रोज किंचितशी वाढ होते आहे. जुलैच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. मागील वर्षी जुलैनंतर पावसाने चांगलीच ओढ दिली होती. त्यामुळे धरणांत अपेक्षित पाणीसाठा जमा झाला नव्हता. सध्या चारही धरणांमध्ये मिळून साडेसोळा टीएमसीपेक्षाही अधिक पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी ९.५ टीएमसी पाणीसाठा होता.
गतवर्षीची तुलना केल्यास सध्याचा पाणीसाठा अधिक असला, तरी पाण्याचा वर्षभराचा वापर लक्षात घेता हा साठा पुरेसा नसल्याचे स्पष्ट आहे. खडकवासला वगळता इतर तीन धरणांची पाणी साठविण्याची क्षमता लक्षात घेता या धरणांमध्ये अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. अपेक्षित पाणीसाठा होईपर्यंत पुणेकरांची सध्याची पाणीकपात रद्द होणार नसल्याचेही यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगल्या पावसाची अपेक्षा करण्यात येत आहे.