एका विशिष्ट घटनेबद्दल बोलण्यापेक्षा आज समाजात अनेक घटना घडत आहेत. मला नेहमी वाटत की, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं. यात महिलांसह तुम्ही,आम्ही देखील येतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावे. यामुळे अशा घटना घडणार नाहीत, असे गायक उत्कर्ष शिंदे म्हणाले. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
गायक उत्कर्ष शिंदे आणि प्रीती तेजस यांनी गायलेले ‘बघून तुला’ हे प्रेमगीत ‘व्हॅलेंनटाईन डे’च्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात राहुल बोऱ्हाडे आणि श्रद्धा पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी उत्कर्ष शिंदे म्हणाले, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे सोडले आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. ज्या तरुणीसोबत ही वाईट घटना घडली, ते चुकीचे झालेले आहे. ज्याने कोणी हे केलेले आहे त्याला संविधानिक पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ पोलिसांची नाही, आपली देखील आहे. असे ते म्हणाले.
रावण हा जाळल्याने मरणार नाही. रावण हा आपल्या सर्वांमध्ये असतो. जोपर्यंत आपण आपल्यातील राम जिवंत ठेवणार नाही, तोपर्यंत अशा घटना घडत राहतील. असले रावण समाजात येत राहतील. आपण गाफील राहिल्याने अशा घटना घडत आहेत असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.