महाराष्ट्रात मराठीच्या वापरासाठी आग्रही असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा हातात घेतल्याचं पहायला मिळतं आहे. पालिकेच्या कारभारात मराठीचा वापर होण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरील प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या पाट्या आणि विभागांना इंग्रजीतून दिलेल्या नावांवर मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलं. मराठी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत मनसेचे काही कार्यकर्ते महापालिकेच्या आवारात घुसले होते.

या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकत्यांकडून जलतरण तलाव, अप्पू घर, पीएमपीएमएल बस यांची तिकीटंही मराठीतून छापण्याची मागणी करण्यात आली. पालिका प्रशासनाने इंग्रजी पाट्या  बदलून मराठी पाट्या लावल्या नाहीत, तर आगामी काळात अधिकाऱ्यांना काळं फासलं जाईल असा इशारा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिला. पालिकेचे अतिरीक्त आयुक्त प्रविण आष्टेकर यांना मनसेने आपल्या मागण्यांचं निवेदन सुपूर्द केलं. त्यामुळे आगामी काळात मनसेचं हे आंदोलन कोणती दिशा घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader