१४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळू लागला आहे. एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. नवी पेठेमध्ये मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी रास्तारोको सुरू केला आहे. सुरुवातीला अलका चौकातून सिंहगड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांनी रास्तारोको केला होता. पण पोलिसांनी एका बाजूची वाहतूक सुरू केली असली, तरी दुसऱ्या बाजूला विद्यार्थी मोठ्या संख्येने गोळा होऊन एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत आहेत.

mpsc students protesting in pune
पुण्यात विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक

“इतर सर्व परीक्षा होत असताना फक्त एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाणं हे चूक आहे. सरकारने तातडीने हा निर्णय बदलायला हवा. परीक्षेच्या ३ दिवस आधी परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

 

MPSC च्या परीक्षांसाठी पुण्यात अभ्यास करणारे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपापल्या परीक्षा केंद्रांवर वेळेवर उपस्थित राहण्यासाठी पोहोचले होते. मात्र, आता ऐन वेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुका, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि इतर सर्व व्यवहार जर सुरळीत होऊ शकत असतील, तर परीक्षा का होऊ शकत नाहीत? असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करू लागले आहेत.

 

१४ मार्च रोजी होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं परिपत्रक एमपीएससीकडून जारी करण्यात आलं असून त्यामध्ये नव्या तारखा यथावकाश जाहीर केल्या जातील, असं म्हटल्यामुळे नेमक्या परीक्षा पुन्हा कधी होणार? याविषयी देखील विद्यार्थ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे.

MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलली! उमेदवारांची प्रतिक्षा संपेना!