राज्यभरातील नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कामगिरीचे मूल्यमापन करून शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांच्या स्तरावर निर्णय घेण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. राज्यभरातील काही लाख विद्यार्थ्यांशी संबंधित हा विषय असल्याने राज्य शासन याबाबतचा निर्णय कधी घेणार, असा प्रश्न आहे.
करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा अडचणीत आल्या. त्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबतचा निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाने नववी आणि अकरावीच्या परीक्षा पद्धतीबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला आहे. विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या कामगिरीचे मूल्यमापन करून निर्णय घ्यावा, अशी शिफारस प्रस्तावात करण्यात आली आहे.