शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आग लागण्याचे सत्र सुरू आहे. डीएसके विश्व आणि एरंडवण्यातील राजमयूर सोसायटीत दुचाकी वाहनांना आग लागण्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री कात्रज येथील गणेश पार्क सोसायटीत तळमजल्यावर लावलेल्या दुचाकी आणि मोटारींना अचानक आग लागली. या आगीत तीन मोटारी आणि पंधरा दुचाकी जळाल्या. त्यानंतर सकाळी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेल्या वाहनांना आग लागल्याची घटना घडली. तेथे लागलेल्या आगीत अकरा चारचाकी, दोन तीनचाकी आणि दोन दुचाकी अशी १५ वाहने भस्मसात झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज चौकाजवळ असलेल्या गणेश पार्क सोसायटीच्या आवारात लावलेल्या १८ गाड्यांना आग लागल्याची माहिती नागरिकांकडून मिळाली. यामध्ये तीन मोटारी आणि १५ दुचाकींचा समावेश आहे. आगीचे लोट इमारतीच्या मजल्यांपर्यंत पोहोचले होते. अग्निशामक दलाने पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणली. आग कोणी लावली याचा शोध घेण्यात येतो आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरणही तपासण्यात येते आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्याच्या समोर लावलेल्या वाहनांना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही वाहने निकामी झाली असून त्यांच्या मालकांचा शोध न लागल्यामुळे ही बेवारस वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली होती. आगीत अकरा चारचाकी, दोन तीनचाकी आणि दोन दुचाकी वाहने जळाली. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या आवारात लावलेली वाहने उष्णतेमुळे पेटली असावीत, अशी शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Mar 2016 रोजी प्रकाशित
पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, ३३ वाहने भस्मसात
पूर्ववैमनस्यातून या घटना घडत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 29-03-2016 at 10:19 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once again two wheelars burnt in pune