कात्रज येथील गणेश पार्क सोसायटीत तळमजल्यावर लावलेल्या दुचाकी आणि मोटारींना अचानक आग लागल्याप्रकरणी पोलिसांनी प्रणय धावटे (वय ३०, रा. गणेश पार्क, कात्रज) याला अटक केली. त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. स्वतःच्या गाडीला रंग लावला म्हणून रागातून प्रणयने सोसायटीतील इतर वाहनांना आग लावल्याचे तपासात दिसून आले आहे. प्रणयला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कात्रज चौकाजवळ असलेल्या गणेश पार्क सोसायटीच्या आवारात लावलेल्या १८ गाड्यांना सोमवारी रात्री आग लागल्याची माहिती नागरिकांकडून पोलिसांना मिळाली. यामध्ये तीन मोटारी आणि १५ दुचाकींचा समावेश आहे. आगीचे लोट इमारतीच्या मजल्यांपर्यंत पोहोचले होते. अग्निशामक दलाने पाण्याचा फवारा करून आग आटोक्यात आणली. शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आग लागण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे. डीएसके विश्व आणि एरंडवण्यातील राजमयूर सोसायटीत दुचाकी वाहनांना आग लावण्यात आल्यानंतर कात्रजमध्ये जळीतकांड घडले होते.