रोहन प्रकाशन आणि पुण्यभूषण फाउंडेशनचा उपक्रम

पुणे : करोना काळातील अवघड परिस्थितीत नागरिकांना विश्वास देत आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पुणे पोलीस दलाला रोहन प्रकाशन आणि पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे एक हजार पुस्तकांची विशेष भेट मंगळवारी देण्यात आली.  रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या विनोदी साहित्यातील काही निवडक पुस्तकांच्या एक हजार प्रती पोलीस दलाला भेट देण्यात आल्या.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त  मितेश घट्टे, लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आणि रोहन प्रकाशनाचे रोहन चंपानेरकर या वेळी उपस्थित होते. गेल्या वर्षीपासून अत्यंत बिकट अशा करोना संकट काळात पुणे पोलीस निग्रहाने, चिकाटीने आणि जबाबदारीने अविरत काम करत आहेत. नागरिकांची मन:स्थिती सांभाळत, वेळोवेळी आश्वस्त करत, धीर देत पोलीस विभाग काम करत आहे. शहर अनुशासनाची आणि सुव्यवस्थेची जबाबदारी अनेकदा स्वत:चा जीवही धोक्यात घालून ते पार पाडत आहेत. वेळेची मर्यादाही त्यांच्या कामाच्या आड येत नाही. या कामाबद्दल कौतुक आणि आदर व्यक्त करण्यासाठी ही विशेष भेट देण्यात आली, असे डॉ. देसाई यांनी सांगितले. पोलिसांच्या मनावरचा तणाव कमी करता यावा, यासाठी ही भेट देण्यात आली, असे चंपानेरकर यांनी सांगितले.