राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेची सोयीस्कर युती; काँग्रेसचे ‘एकला चलो रे’!

पिंपरी पालिकेच्या राजकारणात सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला घेरण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विविध मुद्दय़ांवर सोयीनुसार एकत्र आलेले राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेने भाजपच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. तर, काँग्रेसने ‘एकला चलो रे’, अशी सावध भूमिका घेतली आहे. भाजप आणि इतर पक्षांच्या राजकारणात पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे सँडविच झाले असून सध्या ते विरोधकांच्या रडारवर आहेत.

पिंपरी पालिकेचा कारभार भाजपकडे आला, त्यास वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेने विविध मुद्दय़ांवर आंदोलने करत भाजपला खिंडीत गाठण्याची व्यूहरचना केली आहे. त्यानुसार, तीनही पक्षांनी पालिकेतील भ्रष्टाचारासह विविध मुद्दय़ांवर आंदोलनांचा सपाटा लावला आहे. तर, विरोधकांच्या सोयीस्कर युतीत फरफटत न जाण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. महत्त्वाच्या विषयावर काँग्रेसने विरोधी आघाडीत हजेरी लावली होती. मात्र, प्रत्येक वेळी त्यांच्यात सहभागी न होता काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याची पक्षाची भूमिका दिसून येते. राष्ट्रवादीने सभागृहात आणि सभागृहाबाहेर भाजपविरोधी संघर्ष कायम ठेवला आहे. शिवसेनेनेही तोच कित्ता गिरवला आहे. अनेक विषयात राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपविरोधात एकत्र आहेत. काही दिवसांपासून दोन्हीकडील नेत्यांमध्ये परस्परांवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

पालिका आयुक्त हर्डीकर यांची या घडामोडीत कोंडी झाली आहे. भाजप नेत्यांच्या तालावर आयुक्त नाचत असून ते भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे वागत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे विरोधकांनी आयुक्तांना लक्ष्य केले आहे. आयुक्तांवर सातत्याने गंभीर आरोप होत आहेत. २० फेब्रुवारीच्या सभेसाठी आयुक्त पालिका मुख्यालयात आले असता, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लिफ्टमध्येच घेराव घातला. यापूर्वीच्या सभेत आयुक्तांना काळे फासण्याची भाषाही वापरली गेली होती. सोमवारी अंदाजपत्रकीय सभेतही भाजपविरोधातील ही सोयीस्कर एकजूट राहणार आहे.

Story img Loader