दिवसाला ११० गाडय़ा रस्त्यातच नादुरुस्त; भर उन्हात प्रवाशांचे हाल, वाहतुकीचा बोजवारा

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) गाडय़ा भर रस्त्यात बंद पडण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. दिवसाला सरासरी ११० गाडय़ा रस्त्यातच नादुरुस्त होत असल्याची माहिती पीएमपीने दिलेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे. गेल्या ९० दिवसांत १० हजार १६५ गाडय़ा नादुरुस्त झाल्याची नोंद पीएमपीकडे करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गाडय़ा बंद पडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे प्रवाशांनाही मध्येच उतरावे लागत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेळप्रसंगी गाडीला धक्का देऊन ती सुरू करण्याचे काम प्रवाशांनाच करावे लागते. या प्रकारात वाहतुकीचाही बोजवारा उडतो.

पीएमपीच्या नादुरुस्त गाडय़ा रस्त्यावर येण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे गाडय़ा मार्गावरच बंद पडण्याच्या प्रकाराने कहर केला आहे. पुणे आणि िपपरी-चिंचवड शहरात जागोजागी बंद पडलेल्या गाडय़ा दिसून येत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. प्रवास पूर्ण होण्यापूर्वीच गाडीतून खाली उतरावे लागते. भर उन्हात दुसऱ्या गाडीची वाट पाहावी लागते. येणारी गाडी आधीच भरून आली असल्यास होणारा त्रास वेगळाच असतो. एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे, रस्त्यात पीएमपी बंद पडल्याने होणारी वाहतूककोंडी ही वेगळीच समस्या आहे. बंद पडलेल्या पीएमपीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. लांब रांगा लागतात, वाहनस्वार कर्कश हॉर्न वाजवून हैराण करून सोडतात. मात्र, याकडे पाहण्यासाठी कोणाला वेळ नाही.

केवळ पीएमपीची गाडी बंद पडणे इथपर्यंत हा प्रश्न मर्यादित नसून, पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतील, अशा अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. गाडी कलंडणे, धावत्या गाडीने पेट घेणे असे प्रकार होत आहेत. तुकाराम मुंढे पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी होते, तेव्हा पीएमपीच्या कारभाराला जी शिस्त होती, ती आता राहिलेली नाही, याची कबुली पीएमपी वर्तुळात दिली जाते. मुंढे यांनी घेतलेले अनेक चांगले निर्णय त्यांच्या बदलीनंतर तडकाफडकी बदलण्यात आले. पीएमपीच्या कारभारावर कोणाचेही नियंत्रण नाही, त्याचे हे काही परिणाम आहेत. रस्त्यात बंद पडणाऱ्या पीएमपी हा त्याचाच एक भाग आहे. नव्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे या अनिच्छेने या पदावर आल्या असून रुजू झाल्यापासून त्यांनी पीएमपीसाठी काही ठोस उपाय केले नाहीत. प्रवाशांना अपेक्षित सुविधा, त्यांची सुरक्षा याकडे दुर्लक्ष होत असून सर्व काही वाऱ्यावर असल्याचे चित्र प्रकर्षांने पुढे आले आहे.

ब्रेकडाऊनचे प्रमाण

जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांतील अहवाल पीएमपीकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. ब्रेकडाऊन आणि डिफॉल्ट अशा प्रकारात बंद पडलेल्या गाडय़ांची विभागणी करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात १३७८, फेब्रुवारी महिन्यात ११९८ आणि मार्च महिन्यात ११४६ ब्रेकडाऊन झाल्याची नोंद आहे. तर जानेवारी महिन्यात २०३८, फेब्रुवारी महिन्यात २३२० आणि मार्च महिन्यात २०८५ गाडय़ा डिफॉल्ट झाल्याची माहिती अहवालात देण्यात आल्याचे पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. बंद पडत असलेल्या बहुतांश गाडय़ा ठेकेदारांच्या आहेत. या आकडेवारीवरून ब्रेकडाऊनचे प्रमाण शून्य टक्क्य़ांवर आणण्याचा पीएमपी प्रशासनाचा दावाही फोल ठरला आहे. मनुष्यबळाची कमतरता, उच्च दर्जाच्या सुट्टय़ा भागांची (स्पेअर पार्ट्स) अनुपलब्धता आणि देखभाल दुरुस्तीचा अभाव अशी कारणे पीएमपीकडून देण्यात येत आहेत. तसेच ब्रेकडाऊन होत असलेल्या गाडय़ांचे आयुर्मान हे दहा ते बारा वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे.

Story img Loader