मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धिलोलुप नेत्यांना फटकारले!
पिंपरी भाजपमधील अंतर्गत वादाच्या उलटसुलट बातम्या सातत्याने वाहिन्यांवर आणि वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत असल्याने पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर भाजपच्या नेत्यांना चांगलेच फटकारले. पुण्यात इतक्या समित्या, पदाधिकारी, नेते आहेत, त्यांची कधी बातमी येत नाही. मग, उठसूठ पिंपरीच्याच बातम्या कशा येतात, अशा शब्दात त्यांनी भाजप नेत्यांना खडसावले.
पिंपरी पालिकेतील कारभाराच्या व अंतर्गत वादासंदर्भातील तक्रारीवरून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षां’ निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक झाली. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस व्ही. सतिश, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, पक्षनेता एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, प्रदेश चिटणीस उमा खापरे बैठकीस उपस्थित होते.
पिंपरीच्या बातम्या सारख्या का येत असतात? पुण्यात बातम्यांचे विषय कधी होत नाहीत. मात्र, पिंपरीत छोटय़ा-छोटय़ा गोष्टींवर पेपरबाजी होते. पत्रकार तुमचे मित्र आहेत. मैत्रीखातर त्यांना आतील गोष्टी सांगितल्या जातात. त्या माहितीचा आधार घेत ते बातम्या करतात. छोटी गोष्ट असली तरी मोठय़ा बातम्या प्रसिद्ध होतात. मोठे कारण असेल आणि मोठी बातमी आल्यास एकवेळ समजू शकतो. मात्र, किरकोळ मुद्दय़ांवरून मोठय़ा बातम्या होतात. कारण नसताना तुम्ही पत्रकारांकडे जाता, म्हणून उठसूठ पिंपरी-चिंचवडच्या बातम्या येतात आणि पक्षाची प्रतिमा मलिन होते, अशा शब्दांत कोणाचाही नामोल्लेख न करता मुख्यमंत्र्यांनी फटकारले. त्याचा परिणाम म्हणजे, या बैठकीसंदर्भात कोणीही, काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. नेहमी पत्रकारांच्या पुढे-मागे करणारे भाजप नेते त्यांच्यापासून दूर असल्याचे दाखवत होते.
दोन वेळा रद्द झालेली ही बैठक बुधवारी नियोजित वेळेपेक्षा खूपच उशिराने सुरू झाली. खासदार साबळे यांनी, ४२५ कोटींच्या रस्तेविकासकामातील संगनमताचा (रिंग) मुद्दा बैठकीत उपस्थित केला. त्यावर, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी त्यांची बाजू मांडली. सोबत असलेली माहिती दाखवत त्यांनी पालिकेची बचत केल्याचा दावाही केला. शहराध्यक्ष जगताप, आमदार लांडगे यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. समाविष्ट गावांमध्ये आतापर्यंत कामे झाली नव्हती, ही कामे मार्गी लागल्याने या भागातील नागरिक खूश आहेत, असा युक्तिवाद लांडगे यांनी केला. शहराध्यक्ष जगताप यांनी, शास्तीकराचा मुद्दा उपस्थित केला. बेकायदा बांधकामे व त्याअनुषंगाने लावण्यात आलेल्या शास्तीकराचा विषय निकाली काढण्याची विनंती स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना केली, तेव्हा आगामी अधिवेशनात त्यादृष्टीने निर्णय घेण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी केल्या.