पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठय़ाच्या प्रश्नावर शनिवारी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर महापालिकेवर हंडा मोर्चा काढला जाईल, असा इशारा सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी दिला. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा आठ दिवसांत सुरळीत करण्याचे आश्वासन नगरसेवकांना बैठकीत दिले.

या बैठकीला महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक उपस्थित होते. बैठकीमध्ये नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवर विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून आगपाखड केली. नागरिकांना पाणी वेळेवर मिळत नाही. अधिकारी फोन उचलत नाहीत. नागरिकांच्या प्रश्नांना आम्हाला उत्तरे द्यावी लागतात, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात पाणीपुरवठा सुरळीत होता. काही अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसशी संगनमत करतात किंवा राजकीय भांडणे लावण्याचे काम करतात, असा आरोप बैठकीत करण्यात आला.

पाणीपुरवठा विभागातील अधिकारी नगरसेवकांना जुमानत नाहीत, याचा खेद वाटतो. पाणीपुरवठा विभागातील काही अधिकाऱ्यांची बदली करण्याची गरज आहे. पाणीटंचाईबाबत विचारणा केली, की अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नगरसेवकांना गृहीत धरतात. अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना गृहीत धरले तर सत्ताधारी पक्षातील नगरसेवक महापालिकेवर हंडा मोर्चा आणतील, असा इशारा या वेळी देण्यात आला. नगरसेवकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आठ दिवसाचा वेळ द्या, आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन दिले.

Story img Loader