पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपमधील घडामोडींना वेग; इच्छुकांची मोर्चेबांधणी

पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांची निर्धारित सव्वा वर्षांची मुदत संपली असल्याने त्यांनी महापौरपदाचा राजीनामा द्यावा, असा त्यांच्यावर वाढता दबाव आहे. महापौरांनीही प्रतिष्ठेचा मुद्दा न करता राजीनामा देण्याची मानसिकता ठेवली आहे. महापौरपदावरून शहर भाजमधील घडामोडींनी वेग घेतला आहे.

पिंपरीच्या महापौरपदासाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण आहे. अडीच वर्षांच्या या आरक्षण कालावधीत प्रत्येकी सव्वा वर्षांचे दोन महापौर करण्याचे सत्ताधारी भाजपचे नियोजन आहे. त्यानुसार, पहिल्या वर्षांसाठी नितीन काळजे यांना संधी मिळाली. महापौरांचा सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होऊन गेल्याने काळजे यांनी राजीनामा दिला पाहिजे, असा सूर व्यक्त होऊ लागला आहे. जून महिन्याची सर्वसाधारण सभा झाल्यानंतर ते राजीनामा देतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, ती सभा सातत्याने तहकूब होत होती. अखेर, बुधवारी सभेचे कामकाज उरकण्यात आले. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महापौरांचा राजीनामा घेतला जाणार असल्याचे स्पष्ट झाल्याने शहरातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. पुढील महापौरपदासाठी भाजपमध्ये बरेचजण इच्छुक आहेत. त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने उमेदवारी मिळेल तो नगरसेवक महापौर होण्यात अडचण येणार नाही. त्यामुळे पुढील संधी कोणाला मिळणार, याविषयी उत्सुकता आहे.

प्रमुख दावेदार अडचणीत?

महापौरपदाचे प्रमुख दावेदार म्हणून ज्येष्ठ नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्याकडे पाहिले जाते. ते ओबीसी राखीव प्रभागातून निवडून आले आहेत. काटे यांनी बनावट कुणबी दाखला सादर करून निवडणूक लढवल्याचा आरोप करत बाळासाहेब काकरे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. त्यानुसार, जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने फेरपडताळणी करावी, असे आदेश न्यायालयाने जातपडताळणी समितीला दिले आहेत. त्यामुळे काटे अडचणीत आले आहेत. या समितीपुढे सर्व कागदपत्रे सादर करून त्याची सत्यता पडताळून घेऊ, तेव्हा सत्य उजेडात येईल, असे काटे यांनी म्हटले आहे.