नव्या कारभाऱ्यांचे, पुढचं पाठ, मागचं सपाट!

पिंपरी पालिकेत सत्तांतर झाले आणि भाजपकडे कारभार आला. मात्र, मावळत्या वर्षांत भाजपची कामगिरी समाधानकारक नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. पक्षांतर्गत नाराजीचा प्रत्यय अनेक घटनांनी आला.

वर्षांच्या सुरूवातीलाच सर्वाधिक उंचीचा झेंडा निगडीत उभारण्यात आला. पुढे, त्याची देखभाल न झाल्याने तो टीकेचा विषय ठरला. रखडलेला निगडी ते दापोडी बीआरटीचा मार्ग सुरू करण्यात आला, त्यातही बऱ्याच अडचणी पुढे आल्या. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी ममता विनायक गायकवाड यांची अनपेक्षित लॉटरी लागली. तर, महापौरपदी चिखलीचे राहुल जाधव यांची वर्णी लागली. महापौर निवडीच्या दिवशी जाधव समर्थकांनी १०० पोती भंडाऱ्याची उधळण केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका झाली. दोन्ही पदांच्या निवडी नाटय़ावरून सत्तारूढ भाजपमध्ये नाराजी नाटय़ घडले. पक्षनेते एकनाथ पवार यांच्या कार्यपद्धतीविषयी नगरसेवकांमध्येच सातत्याने नाराजीची भावना आहे. पिंपरी प्राधिकरणाच्या अध्यक्षपद सदाशिव खाडे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब झाले.

मराठा क्रांती मोर्चाने शहरातील आमदार व खासदारांच्या घरांवर मोर्चे काढले. चिंचवडला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केले होते. चिंचवडला खासदार श्रीरंग बारणे यांच्या कार्यक्रमासाठी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन आल्या, तेव्हा भाजप नेत्यांनी व नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. स्मार्ट सिटीच्या कामाला सुरूवात झाली, आतापर्यंत सहा बैठका झाल्या. मात्र, ठोस कार्यवाही झालेली नाही. शहरात मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. याशिवाय, रस्ते व पुलाचं कामे सुरू आहेत. या कामांमुळे शहरातील वाहतुकीची दररोज कोंडी होत असल्याचे चित्र आहे. पालिका सभागृहात सतत गोंधळ घालण्याची परंपरा कायम आहे. एका बैठकीत आयुक्त श्रावण हर्डीकर आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. महापालिकेत आंदोलनाचा धडाका यावर्षीही कायम राहिला. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कक्षात डुकरे आणून सोडण्याचे आंदोलनही झाले. तीन नोव्हेंबरला मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवार, रावसाहेब दानवे आदी दिग्गज मंडळी शहरात आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मावळ लोकसभेच्या निमित्ताने अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात प्रवेशाची चर्चा सुरू झाली.

Story img Loader