आयुक्तांचा ३०० गृहसंस्थांशी वेबसंवाद, प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने आयोजित वेबसंवादात पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार लक्ष्मण जगताप, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे आदींनी संवाद साधला आणि तब्बल तीनशे नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन केले. महापालिकेने कर भरण्यासाठी जूनपर्यंत सूट दिली असून या काळात कोणताही दंड आकारला जाणार नसल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी झालेल्या या कार्यक्रमात हर्डीकर म्हणाले की, शहरातील गृहनिर्माण सोसायटय़ांपुढे पालिकेच्या करांबाबत बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. तूर्त पालिकेने जूनपर्यंत कर भरण्याची सूट दिली आहे. मात्र, मालमत्ता करात सवलत देण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

आर्थिक स्थितीचे विश्लेषण करून या विषयी योग्य वेळी निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

पोलीस उपायुक्त ढाकणे म्हणाले की, पुढील सात दिवस टाळेबंदीची कडक अंमलबजावणी होणार असून अनेक निर्बंध लावण्यात येणार आहेत. आमदार जगताप यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नागरिकांना केले. फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी ढोमसे यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader