पिंपरी- चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयाला अखेर मुहूर्त सापडला असून स्वातंत्र्य दिनी तात्पुरत्या इमारतीमध्ये पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश बापट हे अर्धा तास उशिरा पोहोचल्याने पोलिसांना पावसात भिजत पालकमंत्र्यांची वाट पाहावी लागली. यावरुन सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्टपासून सुरू करण्याची अधिसूचना राज्य शासनाने काढली. मात्र, जागा मिळत नसल्याने बुधवारी ऑटो क्लस्टर येथील इमारतीत तात्पुरत्या स्वरुपात पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे काम सुरु करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश बापट येणार होते. पोलीस अधिकारी व कर्मचारी मंत्री महोदयांची प्रतीक्षा करत होते. मात्र मंत्री महोदयांना पोहोचायला अर्धा तास उशिर झाला. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना पावसातच थांबावे लागले. तर वरिष्ठ अधिकारी हे इमारतीच्या छताखाली थांबले. त्यामुळे पहिल्याच दिवशी नेत्यांची प्रतीक्षा करताना पोलीस कर्मचारी पावसात भिजून गेले.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बापट यांनी पोलीस आयुक्तलयाला घाई झाली नाही असे सांगितले. आपणही नवीन घरात राहायला गेल्यानंतरच तिथे सोयी करतो, दाखलाही त्यांनी दिला. सरकारमार्फत आगामी काळात सर्व मदत दिली जाईल. त्यामुळं काही घाई झालेली नाही, चांगल्या प्रकारे पोलीस आयुक्तालय कार्यन्वित होत आहे, असे बापट म्हणाले. तर पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी गुन्हेगारी वृत्तीच्या नेत्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.
जनतेची सेवा म्हणून आम्ही काम करणार असून जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल. जनता देखील पोलीस होणार, असे म्हणत वाहतुकीबाबत नागरिकांनी एक फोटो काढून पाठवायचा त्याच्यावर आम्ही कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.