परदेशांतील शहरांमध्येही आपल्यासारखे मोठे रस्ते नाहीत. मात्र, तरीही शहरांमध्ये रोजच वाहतूक कोंडी होत असते. एकूणच पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना वाहतुकीच्या नियमावलीचा धाक राहिलेला नाही, अशा शब्दांत महापौर नितीन काळजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, जे नागरिक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी म्हटले आहे.
महापौरपदाच्या कारकिर्दीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कालच महापौर नितीन काळजे यांचा कार्यकाळाची वर्षपूर्ती झाली. विशेष म्हणजे त्यांच्याच भाजपा सरकारच्या वर्षपूर्तीची माहिती देण्यासाठी काल पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेतच त्यांनी माहिती देणे अपेक्षित होते. मात्र, नाराज असलेल्या महापौरांनी आज स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन वर्षपूर्ती निमित्त विविध कामकाजाची माहिती दिली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक कोंडीची समस्या नेहमीचीच झाली आहे. लग्नसराईत आणि दररोज संध्याकाळी शहरांमध्ये वाहतूक कोंडी जाणवते. नागरिकांना वाहतुकीची शिस्त नसल्याने ही वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे जे नागरिक नियम तोडतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे यावेळी महापौर म्हणाले.
शहरातील रस्ते खूप मोठे आहेत, असे रस्ते परदेशात पण नाहीत. परंतू तरीदेखील शहरात वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांकडून शिस्त पाळली जात नाही. विद्यार्थी आणि सजक नागरिक वाहतूक नियम तोडतात. एकूणच वाहतुकीच्या नियमांबाबत पिंपरी-चिंचवडकरांना धाक राहिला नसल्याचे महापौर काळजे यावेळी म्हणाले. तसेच जे नागरिक वाहतुकीचे नियम तोडतील अशांवर कडक कारवाई करावी अशी माझी नेहमी भूमिका असते असे देखील ते यावेळी म्हणाले.