पिंपरी पालिकेच्या राजकारणात विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा सपाटा लावला असल्याने सत्तारूढ भारतीय जनता पक्षाशी त्यांचे सातत्याने खटके उडत आहेत. परिणामी, राष्ट्रवादी आणि भाजपमधील संघर्ष सभागृहाप्रमाणेच रस्त्यावरही दिसू लागला आहे.
पिंपरी पालिकेची सत्ता १५ वर्षे राष्ट्रवादीकडे होती. दीड वर्षांपासून पालिका भाजपकडे आहे. विरोधात असताना भाजपने आंदोलने करून राष्ट्रवादीला भंडावून सोडले होते. त्याचपद्धतीने, राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधात आंदोलनांचा सपाटा लावलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही विषयाचे निमित्त करून राष्ट्रवादीकडून रस्त्यावर आंदोलने होत आहेत. पालिका सभागृहातही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अनेक विषयांवर खटके उडत आहेत.
शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याचे कारण देत राष्ट्रवादी काँग्रेसने नुकतेच दोन वेळा आंदोलन केले. २० सप्टेंबरला सभेच्या दिवशी कुत्र्यांची पिले मुख्यालयात आणण्यात आली होती. त्यावरून सभेत गदारोळ झाला आणि कामकाज तहकूब करावे लागले होते. गुरूवारी (२७ सप्टेंबरला) दुपारी पालिका सभा असताना मोकाट कुत्र्यांना पकडून पालिका मुख्यालयात आणण्याचा राष्ट्रवादी नगरसेवकांचा प्रयत्न पोलीस व सुरक्षारक्षकांनी हाणून पाडला. पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खबरदारी घेतल्याने आंदोलकांना मुख्यालयात येता आले नाही. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना प्रवेशद्वाराजवळ अडवण्यात आले. कुत्र्यांच्या गळ्यात बंटी आणि बबली असे फलक लावलेले होते. सभेच्या दिवशी नगरसेवकांनाच अटकाव करण्यात आल्याने बरीच वादावादी झाली. मात्र, आतमध्ये आंदोलन करता येणार नाही, यावर पोलीस ठाम राहिले. आयुक्त कार्यालयातून आलेला चर्चेसाठीचा प्रस्तावही राष्ट्रवादीने नाकारला होता. दोन्ही पक्षांतील ही धूसफूस यापुढेही कायम राहणार असल्याची स्पष्ट चिन्हे आहेत.