कर्मचारी आता आकाशी रंगाच्या सुटबुटात; कार्यालय सर्व सुविधांनी सज्ज

पिंपरी : जुन्या इमारतीमधून मोशी येथील नवीन प्रशस्त तीन मजली इमारतीमध्ये स्थलांतर झाल्यानंतर पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) रुपही पालटले आहे. आरटीओच्या सुसज्ज इमारतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही रुप बदलण्याचा निर्णय उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी घेतला असून त्यानुसार आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचारी आता आकाशी रंगाच्या सुटबुटात काम करताना पहायला मिळत आहेत.

पिंपरी येथे आरटीओचे स्वतंत्र कार्यालय सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षीपर्यंत जागेअभावी या कार्यालयाची फरपट सुरू होती. निगडी वाहतूक नगरी, चिखलीमध्ये अनेक वर्ष अपुऱ्या आणि सुविधा नसणाऱ्या इमारतीमध्ये आरटीओचे कार्यालय सुरू होते. डिसेंबर २०१७ मध्ये पूर्णानगर चिखली येथील जुन्या इमारतीमधून आरटीओ कार्यालयाचे मोशी येथील नवीन इमारतीमध्ये स्थलांतर झाले.

ही जागा प्राधिकरणाने आरटीओ कार्यालयासाठी दिली आहे. त्या जागेत आरटीओची तीन मजली प्रशस्त इमारत आहे. त्या इमारती शेजारी वाहन चाचणी ट्रॅकही आहे. त्यामुळे एकाच जागी सर्व सुविधा असलेले पिंपरीचे हे कार्यालय राज्यातील एकमेव आरटीओ कार्यालय ठरू शकते. पिंपरी आरटीओ

कार्यालयामध्ये तांत्रिक अधिकाऱ्यांना शासकीय नियमाप्रमाणे गणवेशाची सक्ती आहे. मात्र, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ‘ड्रेस कोड’ नव्हता.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या विचारातून आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ‘ड्रेस कोड’ ठरवला असून त्यानुसार गणवेश परिधान करणे सुरू केले आहे. त्यासाठी पाटील यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची कल्पना कर्मचाऱ्यांना समजावून सांगितली. कर्मचाऱ्यांनीही पाटील यांच्या कल्पकतेला दाद देत नवीन ‘ड्रोस कोड’नुसार गणवेश परिधान करण्याची तयारी दर्शविली. सर्व कर्मचाऱ्यांनी आकाशी रंगाचा गणवेश आणि त्यावर आकाशी रंगाचाच कोट कार्यालयीन वेळेत परिधान करावा असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. गणवेश परिधान करून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये उत्साह जाणवत आहे. आरटीओ कार्यालयात कामासाठी येणाऱ्या सामान्य नागरिकांनाही आरटीओ कार्यालयातील कर्मचारी सहज ओळखणे सोपे झाले आहे.

कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ड्रेस कोडनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळी गणवेश परिधान करण्याची मानसिकता दाखविली. कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढून त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त आल्याचा अनुभव आहे.  

आनंद पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी

ड्रेस कोडनुसार सुटाबुटात काम करताना उत्साह वाटतो. कार्यालयीन कामकाज करताना गणवेश परिधान करण्याला कर्मचाऱ्यांनी सर्वानुमते सहमती दर्शविली.

अनिल निगडे, वरिष्ठ लिपिक, आरटीओ कार्यालय पिंपरी

Story img Loader