सुरक्षिततेच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्षच नागरिकांच्या जीवाशी खेळ
पिंपरी-चिंचवड शहरात बीआरटीचे आठ मार्ग निवडण्यात आले. त्यातील मुंबई-पुणे महामार्गावरील बीआरटी प्रकल्पाच्या सुरक्षिततेचा मुद्दा न्यायालयात गेला. महापालिकेने केलेल्या उपाययोजना पुरेशा आहेत की नाही, याची चाचपणी करून प्रायोगिक तत्त्वावर हा मार्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, सुरक्षिततेच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्षच असून महापालिका आणि पीएमपीचा कारभार नियोजनशून्य असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. सुरक्षाविषयक उपाययोजना न करता काहीही करून हा मार्ग सुरू करण्याचा अट्टहास केला तर अपघातांना आपणहून आमंत्रण दिल्यासारखे आणि नागरिकांच्या जीवाशी खेळल्यासारखे होणार आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी या १२ किलोमीटर अंतराचा बीआरटी प्रकल्प पाच वर्षांपासून रखडलेला आहे. प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. सुरक्षाविषयक बाबींची पूर्तता न केल्याने वाहतूक सुरू झाल्यास अपघातांची शक्यता आहे, यासह विविध मुद्दय़ांवर आक्षेप घेत अॅड. हिम्मतराव जाधव यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वादी-प्रतिवादींच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने प्रायोगिक तत्त्वावर दोन महिन्यांसाठी हा मार्ग सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला. त्याचा सोयीस्कर अर्थ महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी काढला. ज्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्या सुरक्षिततेच्या मुद्दय़ांवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी श्रेयासाठी ‘प्रायोगिक परवानगी’चाही समारंभ साजरा केला. मात्र, सोमवारी मोरवाडी चौकात बीआरटी मार्गात अनेक वाहने अडकून पडण्याच्या प्रकारामुळे सगळेच पितळ उघडे पडले. नादुरुस्त पीएमपी बस बीआरटी मार्गात बंद पडली. त्यामागोमाग अन्य पीएमपी बसेससह इतर वाहनेही अडकली. क्षणात वाहनांच्या रांगा लागल्या. कोणालाही बाहेर पडता येत नव्हते. बघ्यांची गर्दी झाली आणि वाहतुकीची कोंडीही झाली. तासाभराच्या प्रयत्नानंतर अडकलेली ही बस काढण्यात यश आले. मात्र, यातून सुरक्षिततेचा आणि नियोजनाचा मूळ मुद्दा पुन्हा चर्चेत आला. हा मार्ग असुरक्षित आहे, ठोस उपाययोजना न करता बीआरटी मार्गातून बससेवा सुरू केल्यास अपघात होण्याची शक्यता स्पष्टपणे दिसत आहे. मुख्य मार्गातून बाहेर पडताना किंवा सेवा रस्त्यातून मुख्य मार्गात प्रवेश करताना होणारा अपघाताचा धोका दुर्लक्षित करण्यासारखा नाही. मात्र, याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यासाठी आवश्यक उपाययोजना केली जात नाही. एखादा मोठा अपघात होण्याची प्रतीक्षा केली जात आहे का, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मुळातच, मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. आतापर्यंत तात्पुरती सोय म्हणून बीआरटी मार्गातून वाहने जाऊ दिली जात होती. मात्र, बीआरटीतून बससेवा सुरू करताना तो मार्ग इतर वाहनांसाठी बंद करणे आवश्यक होते. तसे न झाल्यामुळे पीएमपी बसच्या मागे-पुढे इतर वाहने दिसून येतात. त्यामुळे अपघाताचा धोका आणखीच वाढला आहे.
बीआरटीचे आठ मार्ग टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजन होते. मात्र, नियोजन नसल्याने अपेक्षित मार्ग सुरू होऊ शकले नाहीत. गेल्या दहा वर्षांत बीआरटी प्रकल्पासाठी केलेल्या खर्चाचा तपशील माहिती अधिकारात उघड झाला, तेव्हा परस्परविरोधी माहिती देण्यात आल्याचे दिसून आले होते. दहा वर्षांपूर्वी ७५ किमी अंतराच्या बीआरटी प्रकल्पाची घोषणा झाली. आजपर्यंत केवळ २२.५ किमी इतकीच बीआरटी कार्यरत असल्याचे व त्याचा खर्च ८९० कोटी असल्याचे एकदा लेखी देण्यात आले होते. दुसऱ्या माहितीत, ७७६ कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले. दोन्हींमध्ये ११४ कोटी रुपयांची तफावत होती. निगडी-दापोडी प्रकल्पाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही त्यावर महापालिकेने पाच कोटी रुपये खर्च केल्याचे दाखवण्यात आले आहे. बीआरटीसाठी उभारलेल्या ८४ बसथांब्यांसाठी तब्बल ४१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. प्रत्यक्षात त्यांचे सांगाडेच शिल्लक आहेत. बसथांब्यांच्या ठिकाणी जुगाराचे अड्डे झाले असून ते गैरव्यवहारांचे आगार बनले आहेत. थांब्याच्या ठिकाणी अतिक्रमणे आहेत. शहरातील नागरिक वाहतूक सेवेविषयी समाधानी नाहीत. पुण्यात बीआरटीचा बोजवारा उडाला असून नियोजनाअभावी पिंपरी-चिंचवडमध्ये त्याचीच पुनरावृत्ती सुरू आहे.
‘मावळ’साठी राष्ट्रवादी शहराध्यक्षांची चाचपणी
मावळ लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही शड्डू ठोकले आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नावाची चाचपणी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. वाढदिवसाचे निमित्त साधून वाघेरे यांनीही मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मावळची जागा शिवसेनेकडे आहे. यापूर्वी गजानन बाबर खासदार होते. आता श्रीरंग बारणे मावळचे प्रतिनिधीत्व करत आहेत. तिसऱ्यांदा मावळवर भगवा फडकावण्याची शिवसेनेची व्यूहरचना आहे. बारणे यांच्या उमेदवारीसाठी पक्षाने हिरवा कंदील दाखवला असून भाजपमध्येही ही जागा खेचून आणण्याची खलबते सुरू आहेत. अशा परिस्थितीत, राष्ट्रवादीनेही मावळात पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ मध्ये आझम पानसरे व २०१४ मध्ये राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने िरगणात उतरवले. मात्र, दोन्ही वेळी त्यांना शिवसेनेकडून पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी मावळात आपला खासदार होऊ शकतो, असे गणित मांडून राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत. मावळ व पिंपरी-चिंचवड शहरात नात्यागोत्यांचे जाळे असलेल्या वाघेरे यांच्या नावाची चाचपणी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. वाघेरे समर्थकांकडून वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण मावळ मतदारसंघात जोरदार फलकबाजी करण्यात आली होती.
balasaheb.javalkar@expressindia.com