पिंपरी महापालिकेची विविध रुग्णालये तसेच दवाखान्यांमध्ये अपेक्षित आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत, ही जुनी तक्रार आहे. तथापि, आजपर्यंत त्यावर ठोस तोडगा निघू शकला नाही. महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार महेश लांडगे यांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा बैठक घेत आरोग्यसेवेत सुधारणा करण्याची ग्वाही दिली. मात्र, आतापर्यंतचा अनुभव पाहता ही आश्वासने कागदावरच राहण्याची शक्यता अधिक वाटते.

‘आरोग्यसेवा ही ईश्वरसेवा’ असल्याचे म्हटले जात असले, तरी पिंपरी महापालिकेच्या रुग्णालये व दवाखान्यांमध्ये तसे काही दिसून येत नाही. बहुतांश ठिकाणी आरोग्यसेवेची ‘ऐशीतैशी’ झाली आहे. या संदर्भात नागरिकांच्या गंभीर तक्रारी आहेत. कित्येक वर्षांपासून ही परिस्थिती असूनही त्या विषयी ठोस उपाययोजना होत नाहीत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात ७५० खाटा आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे त्याही अपुऱ्या पडतात. अतिदक्षता विभागात ३५ आणि लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात १८ खाटा आहेत. रुग्णालयात वर्षांकाठी आठ ते दहा हजार शस्त्रक्रिया होतात. दररोज किमान दीड हजार रुग्णांचा बाह्य़रुग्ण विभाग आहे. इतक्या मोठय़ा संख्येने रुग्ण चव्हाण रुग्णालयात येतात. मात्र, त्यांना पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. केसपेपर काढण्यापासून औषध मिळण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी लांब रांगा लागलेल्या असतात. रुग्णांच्या नातेवाइकांना  थांबण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. रुग्णालयात अपुरे कर्मचारी आहेत. औषधांचा तुटवडा जाणवतो. अनेकदा बाहेरून औषधे आणावी लागतात. इतर वैद्यकीय साहित्यही बाहेरून आणण्याची सक्ती केली जाते. डॉक्टरांचे तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजकारण सुरूच आहे. पिंपरी महापालिकेच्या एकूण आरोग्यसेवेचा आढावा घेण्यासाठी नुकतीच चाणक्य सभागृहात बैठक झाली. कारभारी आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक सुजाता पालांडे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे हे लोकप्रतिनिधी तसेच या विभागाशी संबंधित सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते. सर्वसामान्य रुग्णांना चांगले उपचार मिळाले पाहिजेत, अशी माफक अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली. कर्मचारी संख्या तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे, अशी सूचना सुजाता पालांडे यांनी केली. रुग्णालयाबाहेर टपऱ्यांचा सुळसुळाट झाला असून या अतिक्रमणांमुळे रुग्णालयात वाहने आणताना अडचणी येतात, या मुद्दय़ाकडे लक्ष वेधण्यात आले. डॉक्टरांच्या गटबाजीमुळे अनेकांना त्रास होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. रुग्णालयात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. विविध कारणांवरून चव्हाण रुग्णालयाची मोठय़ा प्रमाणात बदनामी होत असते. तसे होणार नाही, याची काळजी सर्वानी घेतली पाहिजे, असेही मुद्दे मांडण्यात आले. डॉक्टरांनी गटातटाचे राजकारण थांबवून प्रामाणिकपणे काम करावे, अशी अपेक्षा लांडगे यांनी व्यक्त केली. सर्व मुद्दय़ांचा परामर्श घेत आयुक्तांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले. यापूर्वीही अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, त्यानंतर पुन्हा ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशीच परिस्थिती निर्माण होते, हे नेहमीचे चित्र राहिले आहे.

‘स्वाइन फ्लू’मुळे आणखी किती बळी जाणार?

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव दिसून येतो आहे. दोन वर्षांत स्वाइन फ्लूमुळे झालेल्या बळींची संख्या ७२ इतकी झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ६१ जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. मात्र, त्यातून काहीही बोध घेतला गेला नाही. त्याचा परिणाम म्हणा की काय, यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. जानेवारी महिन्यात एका इसमाचा मृत्यू झाला. तर, ऑगस्ट या एकाच महिन्यातील बळींची संख्या दहावर गेली आहे. जानेवारी २०१८ पासून शहरात स्वाइन फ्लूचे ६९ रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर २३ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. त्या २३ रुग्णांपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. स्वाइन फ्लूचा एकूण प्रादुर्भाव पाहता नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, महापालिकेची यंत्रणा ढिम्मच आहे. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी रुग्णालयात अचानक येऊन पाहणी केली. बऱ्याच सूचनाही केल्या. त्यानंतर काहीतरी हालचाल होईल, असे वाटत होते. प्रत्यक्षात, काही झाले नाही. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने चव्हाण रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्याची मागणी केली आहे. सोमवारी (३ सप्टेंबर) दोन जण स्वाइन फ्लूमुळे दगावले. मृत्यूचे हे सत्र कधी थांबणार आणि आणखी किती बळी जाणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

भाजप निष्ठावंतांना न्याय?

भारतीय जनता पक्षाची राजकीय ताकद जशी वाढू लागली, तसे बाहेरून येणारे संधिसाधूंचे लोंढे वाढले. पक्षात नवा आणि जुना वाद निर्माण झाला आणि उत्तरोत्तर तो वाढत गेला. पिंपरीत महापालिका निवडणुकीच्या काळात या वादाने परिसीमा गाठली होती. निष्ठावंतांची तिकिटे कापण्यात आली आणि पाहुण्यांनी अतिक्रमण केल्याची भावना पक्षात होती. अमर साबळे खासदार झाले. अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांना एकदा नव्हे तर दोनदा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. पिंपरी महापालिका स्वीकृत नगरसेवकपदी माउली थोरात आणि अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे यांची वर्णी लागली. अमोल थोरात यांची संघटन सरचिटणीसपदी बढती झाली आणि आता माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची पिंपरी प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाली. टप्याटप्प्याने झालेल्या या निवडप्रक्रिया पाहता हळूहळू का होईना, निष्ठावंतांना कुठेतरी संधी मिळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मधल्या काळात ‘पाहुणे तुपाशी, घरचे उपाशी’ असे जे काही वातावरण भाजपमध्ये तयार झाले होते. ते आता निवळू लागले आहे. सगळं काही स्थिरस्थावर झाल्यानंतरही अलीकडच्या काळात नव्या-जुन्यांचा जो काही वाद सुरू होता, त्याचे सूत्रधार सदाशिव खाडे होते, अशी खात्रीशीर माहिती पक्षातील नेत्यांना होतीच. खाडे यांना प्राधिकरणाचे अध्यक्ष केल्यानंतर आता त्या वादाची तीव्रता कमी होईल, अशी खात्री पक्षातील नेत्यांना वाटते आहे. आता सर्वाच्या नजरा सदस्यपदावर आहेत. सात जणांच्या प्राधिकरण समितीत वर्णी लागावी म्हणून भाजप कार्यकर्ते, नगरसेवकांप्रमाणेच शिवसेना व रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयात ठिकठिकाणी रुग्ण तसेच नातेवाइकांच्या लांब रांगा लागलेल्या असतात.

Story img Loader