वाहनांमुळे शहरांमधील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात पाचशे इलेक्ट्रिक वातानुकूलित गाडय़ा लवकरच दाखल होणार आहेत. या गाडय़ा वातानुकूलित असल्या, तरी प्रवाशांना साध्या गाडीच्या तिकीट दरातच वातानुकूलित गाडय़ांमधून प्रवास करता येणार असल्याची माहिती पीएमपीचे संचालक सिद्घार्थ शिरोळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

पीएमपीच्या संचालकपदी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येत्या काळातील नवीन योजनांविषयीची माहिती देण्यासाठी शिरोळे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, पाचशे इलेक्ट्रिक वातानुकूलित गाडय़ा पीएमपीसाठी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

या गाडय़ा पीएमपीसाठी घेण्याच्या प्रक्रियेसंबंधीची बैठक ९ मे रोजी होणार असून त्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन असून दर महिन्याला किमान पन्नास गाडय़ा मार्गावर येणार आहेत. इलेक्ट्रिक गाडय़ांसाठी पीएमपीला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. या गाडय़ांसाठी केवळ जागा आणि चार्जिग पॉइंटची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडय़ांच्या तिकिटाचे दर कमी ठेवण्यात येणार आहेत.

एकात्मिक वाहतूक आराखडय़ात मेट्रो आणि पीएमपीला जोडण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत किमान एक हजार ई-रिक्षा खरेदी केल्या जाणार आहेत. पीएमपीतून किंवा मेट्रोतून उतरल्यानंतर लगेचच या रिक्षा उपलब्ध होतील, अशीही माहिती शिरोळे यांनी दिली.

गाडय़ांच्या वाढत्या बिघाडाचे प्रमाण लक्षात घेता इलेक्ट्रिक गाडय़ांबरोबरच सीएनजीवर चालणाऱ्या चारशे गाडय़ांचा समावेश पीएमपीच्या ताफ्यात करण्यात येणार आहे.

प्रवासी संख्या २० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

सध्या मंडळाच्या ताफ्यातील २६० गाडय़ा जुन्या असून त्या वर्षभरात बाद कराव्या लागणार आहेत. गेल्या काही दिवसात शहरात २३३ मिडी बसेस दाखल झाल्या असून काही दिवसात ७० मिडी बसेस दाखल होणार आहेत. तसेच पुढील चार वर्षांत प्रवासी संख्या २० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे शिरोळे यांनी सांगितले.