काही दिवसांअगोदर खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर पोखरकरांविरोधात बंड करणारे काही सदस्य सहलीवर गेले. या सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांची फूस असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील वाद शिगेला पोहचल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी खेड येथे प्रत्यक्ष भेट दिली व त्या ठिकाणी पत्रकारपरिषद घेत, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर आज पुण्यात माध्यमांशी बोलताना देखील या मुद्यावरून संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिल्याचे दिसून आले.

पुण्यात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे किंवा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यापैकी कोणावरही आम्ही या संदर्भातील खापर फोडलेलं नाही. हा पूर्णपणे खेड विधानसभा मतदार संघाचे जे आमदार आहेत दिलीप मोहिते त्यांनी घडवून आणलेला विषय आहे. मात्र त्यांनी जरी घडवून आणलेला हा विषय होता, तरी या जिल्ह्याचे या भागाचे महत्वाचे नेते म्हणून आमची अशी अपेक्षा आहे की अजित पवार यांनी यामध्ये लक्ष घालायला हवं.”

अशी संधी आम्हालाही मिळेल पण … –

तसेच, “आमच्या पक्षाच्या प्रमुख लोकांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी या संदर्भात चर्चा करून कल्पना दिली होती. की, असं काही घडत आहे व आपण त्यामध्ये लक्ष घालावं. मी काल देखील सांगितलं, की स्थानिक पातळीवर राजकारण होत असतं कुरघोड्या करत असतात, पण त्या कोणत्या स्तरापर्यंत आपण करू शकतो. हे ठरवायला हवं. अशी संधी आम्हालाही मिळेल पण आम्ही ते करणार नाही. जर आम्हाला अशी संधी मिळाली तर आम्ही नक्कीच या संदर्भात त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा अजित पवार यांच्याशी बोलू व सांगू की तुमची लोकं आमच्यापर्यंत आले आहेत व त्यांना तुमचा पक्ष सोडायचा आहे आणि आमच्याकडे यायचं आहे. तुम्ही तुमच्या लोकांना सांगा. हे आम्ही सांगू शकतो.” असं संजय राऊत म्हणाले.

सत्ता असेल किंवा नसेल याच्याशी काही आम्हाला पडलेलं नाही –

याचबरोबर “राज्याचे मुख्यमंत्री हे आमचे शिवसेनेचे जरी असले तरी आज आम्ही त्यांना महाविकासआघाडीचे मुख्यमंत्री म्हणतो. हीच भूमिका ठेवून जर सगळ्यांनी काम केलं तर हे सरकार पूर्ण काळ चालेल व त्या पलिकडे जाऊन देखील आपल्याला महाराष्ट्राची सत्ता टिकवता येईल. काल मी खेडला गेलो ते मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसारच गेलो होतो. जे आमचे पक्ष प्रमुख आहेत. त्यांचीच भूमिका मी तिथं मांडली. राज्यात जिथं जिथं शिवसेनेला त्रास होईल, त्रास देण्याचा प्रयत्न होईल तिथं मी जाणार. शेवटी माझं नातं माझ्या पक्षाशी आहे, शिवसैनिकांशी आहे. माझा पक्ष टिकवणं व शिवसैनिकांना जर कुणी त्रास देत असेल, जर कुणी शिवसेनेचे पाय खेचत असेल. तर नक्कीच तिथं जाऊन आम्हाला उभं राहावं लागेल. सत्ता असेल किंवा नसेल याच्याशी काही आम्हाला पडलेलं नाही. सत्ता असली किंवा नसली तरी शिवसेना आमच्यासाठी महत्वाची आहे.” असंही शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.