आधार कार्ड काढण्यासाठी ७८ नवी यंत्रे

नव्याने आधार कार्ड काढणे किंवा कार्डमधील तपशिलातील दुरुस्ती, त्याचप्रमाणे ती अद्ययावत करण्यासाठी अद्यापही शहरातील नागरिकांसाठी पुरेशी आधार केंद्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे आधारचा छळ सुरूच असताना टपाल खात्याकडून काहीसा दिलासा मिळू शकणार आहे. आधार कार्ड काढण्यासाठी टपाल खात्याकडे मार्चपर्यंत ७८ नवी यंत्रं येणार आहेत. त्यातील ४१ यंत्रं तातडीने म्हणजेच येत्या दोन ते तीन दिवसांत उपलब्ध होणार आहेत. पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी याबाबतची माहिती दिली.

शासनाच्या विविध योजना आणि सेवा- सुविधांसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बँकेतील खाते आणि मोबाइल क्रमांकही आधार कार्ड क्रमांकाशी जोडावे लागत आहे. अद्यापही आधार कार्ड न मिळालेल्या नागरिकांना त्याबाबत काही कालावधीची मुदत मिळाली असली, तरी ही सक्ती कायम आहे. त्यामुळे आधार कार्ड मिळविण्यासाठी मागील काही महिन्यांपासून शहरात नागरिकांची धावपळ सुरू आहे. त्याचप्रमाणे कार्डवरील तपशील बदलून त्यांचे अद्ययावतीकरण करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या नागरिकांच्या तुलनेत शहरात आधार केंद्रांची संख्या अत्यल्प असल्याने नागरिकांची परवड होत आहे.

पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरातील ठरावीक टपाल कार्यालयांमध्ये सध्या आधार कार्डच्या अद्ययावतीकरणाचे काम करण्यात येते. त्यानुसार पुणे मुख्य टपाल कार्यालय, सीटी पोस्ट, शिवाजीनगर, पर्वती, चिंचवड, पिंपरी या टपाल कार्यालयांच्या माध्यमातून आजपर्यंत १९ हजारांहून अधिक नागरिकांच्या आधार कार्डचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.

२४८ यंत्रांचे संच उपलब्ध

सावळेश्वरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, टपाल विभागाच्या पुणे विभागात येणाऱ्या पुणे, पिंपरी- चिंचवड शहर आणि ग्रामीण भाग, सातारा, सोलापूर, नगर आदी भागांसाठी मार्च महिन्यापर्यंत आधार कार्ड काढण्यासाठी एकूण २४८ यंत्रांचे संच उपलब्ध होणार आहेत. बोयोमॅट्रीक थम्ब, स्कॅनर, प्रिंटर आदींचा या संचात समावेश असेल. त्यापैकी पुण्यासाठी ७८, ग्रामीण विभागासाठी ४४, सातारा ५५, नगर ३३, तर सोलापूरसाठी ३८ यंत्रं उपलब्ध होणार आहेत. पुणे शहरातील गरज पाहता ७८ यंत्रांपैकी जवळपास ४१ यंत्रं येत्या दोन ते तीन दिवसांत उपलब्ध होऊ शकणार आहेत. उर्वरित यंत्रं मार्चपर्यंत मिळू शकतील. या यंत्रांच्या माध्यमातून नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी येणारी अडचण काही प्रमाणात दूर होऊ शकणार आहे.

Story img Loader