अधिसूचना येत्या काही दिवसांत

पुणे : महापालिका हद्दीमध्ये २३ गावांचा समावेश करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. महापालिका हद्दीमध्ये गावे समाविष्ट करण्याचा निर्णय पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गावांच्या समावेशाची अधिसूचना येत्या काही दिवसांत निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या बैठकीवरून महापालिके तील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महत्त्वाच्या बैठकीला निमंत्रित न के ल्याचा आरोप करत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त के ली आहे. तर महापौर मोहोळ राजकारण करत असून बैठकीचे निमंत्रण त्यांना देण्यात आले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी के ला आहे.

महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्याबाबतची अधिसूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जानेवारी महिन्यात काढली होती. त्यानंतर गावांच्या समावेशाबाबत हरकती-सूचना नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. हरकती-सूचनानंतर प्रत्यक्ष सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात आली होती. त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पाठविण्यात आला. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यामध्ये गावांचा समावेश तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामविकासमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह महापालिके तील पदाधिकारी उपस्थित होते. समाविष्ट गावांतील शाळा, अंगणवाडय़ासंह सर्व आस्थापना आणि कार्यालयांच्या जागा महापालिके कडे हस्तांतरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्याला सर्व विभागांनी मान्यता दिली. नगरविकास, महसूल, ग्रामविकास विभागाकडून त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिका हद्दीमध्ये सर्व गावांचा एकाच वेळी समावेश करण्यात येऊ नये. गावांचा समावेश टप्प्याटप्याने करण्यात यावा, अशी भूमिका भाजपची होती. समाविष्ट गावांमध्ये राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने राजकीय दृष्टयाआगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळेच गावांच्या समावेशाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आग्रही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

बैठक निमंत्रणावरून वाद

गावांच्या समावेशावरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी यांच्यात बैठकीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पुण्याच्या प्रश्नासंदर्भात होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण नाही म्हणजे पुणेकरांना डावलल्यासारखे आहे. करोना संकटाशी सामना करताना शहराचे हित लक्षात घेत राज्य शासनाची मदत नसतानाही राजकारण केले नाही, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. बैठकीचे निमंत्रण नव्हते हा महापौरांचा कांगावा चुकीचा आहे. महापौर पदाला ते न शोभणारे आहे. या बैठकीस दृकश्राव्य पद्धतीने उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी के ला.