पुणे शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठया प्रमाणावर आढळत असून आज दिवसभरात १०२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे मागील ४५ दिवसात प्रथमच १४ दिवसाच्या क्वारंटाइननंतर तब्बल १९४ रुग्ण करोनामुक्त झाले, या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभरात ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.
पुणे शहरात मागील काही दिवसात रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत अनेक उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र, त्याचदरम्यान आज दिवसभरात पुण्यात १०२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजअखेर २ हजार ४८२ इतकी रुग्ण संख्या झाली आहे. तर आजच्या एकाच दिवसात ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आज अखेर १४५ मृतांची संख्या झाली आहे. तर आज १४ दिवसांनंतर काही रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आज दिवसभरात तब्बल १९४ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आजअखेर करोनाबाधितांची संख्या १,०२० वर पोहोचली असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.
दिवसभरात ५ करोनाबाधितांचा मृत्यू
पुणे शहरात आज दिवसभरात पाच करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये वारजे भागातील १३ महिन्याच्या चिमुकलीवर उपचार सुरू असताना ससून रुग्णालयात मृत्यू झाला.
प्रतिबंधित क्षेत्रात १७ तारखेपर्यंत सर्व दुकानं बंद राहणार – महापालिका आयुक्त
पुणे शहरातील ६९ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आज मध्यरात्रीपासून ते १७ मेपर्यंत पूर्णपणे सर्व प्रकारची दुकानं बंद राहणार आहेत. त्या क्षेत्रात केवळ दवाखाने सुरु राहणार असून भाजीपाला, दूध हे पोलीस आणि महापालिका प्रशासन गरजेनुसार स्वतः पुरवठा करणार आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढला आहे.