अंबिल ओढा येथील वसाहतीमधील काही घरांवर मागील आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करण्यात आली होती. यात काही घरंही पाडण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेसमोर स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, ‘नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. जो अधिकारी किंवा बिल्डर म्हणत असेल की, मी अजित पवार यांचा माणूस आहे. कुणी कारवाई करू शकत नाही, असं त्या दिवशी म्हणाला असेल, तर त्याबाबत पुरावे द्यावेत. मी स्वतः पोलिसांकडे तक्रार करेन, अशी ग्वाही यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या स्थानिकांच्या घरांवर महापालिकेनं गुरुवारी हातोडा चालवला होता. गुरुवारी पहाटे महापालिकेनं पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. या कारवाई दरम्यान नागरीक आणि स्थानिकांमध्ये संघर्ष होऊन तणाव निर्माण झाला होता. प्रचंड गोंधळानंतरही महापालिकेनं कारवाई सुरूच ठेवली होती. सुरुवातीला कारवाईच्या आदेशाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. बिल्डरनेच कारवाई केल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. मात्र, नंतर महापालिकेनं कारवाईची जबाबदारी घेत स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली असून, पाडण्यात आलेल्या घरांवरून स्थानिक आक्रमक झाले आहेत.

Photos : आंबिल ओढा कारवाई : “पाऊस सुरूये, करोना आहे; आम्ही मरायचं का?”

कारवाईविरोधात नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज सकाळपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलनास बसले होते. त्याच दरम्यान बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या कामानिमित्त महापालिकेत आल्या होत्या. प्रवेशद्वाराजवळील आंदोलन पाहून सुप्रिया सुळे यांनी नागरिकांची भेट घेतली आणि समस्या जाणून घेतल्या.

हेही वाचा- आंबिल ओढा कारवाई : सुप्रिया सुळेंसमोर घरं पाडलेल्या स्थानिकांचा आक्रोश

यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार मुर्दाबाद, पालकमंत्री राजीनामा द्या, अशा घोषणा दिल्या. तसंच “निकम बिल्डर आणि महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. अजित पवार यांचा माणूस आहे अशी धमकी देऊन त्यावेळी आमच्यावर कारवाई झाली. आम्हाला आमची घरे द्या,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे त्यांनी केली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कुणावरही अन्याय होणार नाही. जो कुणी असं म्हणाला असेल की, अजित पवार यांचा माणूस आहे आणि कारवाई होणार नाही. त्याबद्दलचे पुरावे मला द्या, मी स्वतः पोलिसांत तक्रार करेन, अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी आंदोलनकर्त्याना यावेळी दिली.