मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये पुणे-लोणावळासारख्या उपनगरीय रेल्वे गाडय़ांचे तिकीट मोबाइलवर मिळण्याच्या सुविधेचा रविवारी प्रारंभ करण्यात आला. यूटीएस या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना मोबाइलवर तिकीट काढता येणार आहे.

मोबाइल अ‍ॅप तिकिटाच्या सुविधेचे उद्घाटन खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर, प्रफुल्ल चंद्रा आदी त्या वेळी उपस्थित होते. पुणे-लोणावळा उपनगरीय वाहतुकीचा लाभ दररोज एक लाख १२ हजार प्रवासी घेतात. या प्रवाशांना या नव्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या सुविधेबाबत माहिती देताना देऊस्कर यांनी सांगितले की, मोबाइलवर तिकीट मिळण्यासाठी यूटीएस हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअर, विंडो स्टोअर, अ‍ॅपल स्टोअर या माध्यमातून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल.

अ‍ॅपच्या माध्यमातून रेल्वे स्थानकावर, स्थानकाच्या इमारतीतून तसेच लोहमार्गापासून दोन किलोमीटरच्या परिघामध्ये तिकीट काढता येणार आहे. प्रवास करताना मोबाइलवर आलेली तिकिटाची प्रतिमा दाखवावी लागेल. तिकीट तपासणी होत असल्यास संबंधित अ‍ॅपवरील शो तिकीट या पर्यायामध्ये ऑफलाइन असतानाही तिकीट दाखविता येणार आहे. संबंधित तिकीट दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येणार नाही. त्याचप्रमाणे हे तिकीट रद्दही करता येणार नाही.

तिकीट असे काढा

मोबाइलवर तिकीट काढण्यासाठीच्या यूटीएस अ‍ॅपमध्ये प्रवाशाला नोंदणी करावी लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधिताला एसएमएसच्या माध्यमातून पासवर्ड दिला जाईल. तिकिटाचे पैसे देण्यासाठी आर वॉलेटचा वापर करावा लागेल. आर-वॉलेटला यूटीसी काऊंटरवर ऑनलाइन किंवा आयआरसीटीसीच्या कॉमन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून रिचार्ज करता येईल.