पुणे, शिवाजीनगर स्थानकांवरून मेट्रोकडे जाण्याचा मार्ग; प्राधिकरणाकडून आराखडा तयार
शहरात वेगाने काम सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पातील स्थानकांना प्रमुख रेल्वे स्थानकांशी जोडून या दोन्ही सार्वजनिक प्रवासी सेवांना संलग्न करण्याच्या दृष्टीने सध्या नियोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पुणे आणि शिवाजीनगर स्थानके मेट्रोच्या स्थानकांना जोडण्याबाबत आराखडा तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात रेल्वे आणि मेट्रो या दोन्हीं सेवांची आवश्यकता असणाऱ्या प्रवाशांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे.
पिंपरी ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचे काम महामेट्रोच्या वतीने सध्या सुरू करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम नियोजित करण्यात आले आहे. महामेट्रोच्या वतीने करण्यात येणाऱ्या दोन्ही मार्गाचे काम सध्या झपाटय़ाने सुरू आहे. पिंपरी भागामध्ये पिंपरी ते दापोडी या टप्प्यात मेट्रो मार्गासाठी पिलर उभे करण्यात येत आहेत. एकूणच मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मेट्रोच्या दोन्ही मार्गाच्या जवळ रेल्वेची काही स्थानके येतात. त्यामुळे या भागामध्ये मेट्रोची स्थानके रेल्वेच्या स्थानकाजवळ घेऊन ती एकमेकांना जोडण्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
वनाज ते रामवाडी मेट्रो मार्ग पुणे रेल्वे स्थानकाजवळून जाणार आहे. रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ राजा बहाद्दूर मिल रस्त्यावर मेट्रोच्या स्थानकाचे नियोजन करण्यात आले आहे.
पुणे रेल्वे स्थानकातील नवा पादचारी पूल थेट मेट्रोच्या स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रोतून उतरून प्रवासी रेल्वेचा वापर करू शकतील. त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवासीही शहरांतर्गत प्रवासासाठी थेट मेट्रो स्थानकावर जाऊ शकेल. त्याचप्रमाणे पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्ग शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळून जाणार आहे. या भागातही रेल्वे मेट्रो स्थानकातून रेल्वे स्थानकात येण्या-जाण्यासाठीचा मार्ग करण्याचे नियोजन आहे.
रेल्वे आणि मेट्रो स्थानके जोडली गेल्यास भविष्यात प्रवाशांना शहरांतर्गत प्रवास करून रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जाता येईल. त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकातून थेट शहरांतर्गत प्रवासाचा लाभही घेता येईल.
मेट्रो मार्गामुळे विविध विभागांची रेल्वेशी जवळीक
वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावर येणारे पुणे रेल्वे स्थानक आणि पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गावर येणारे शिवाजीनगर स्थानक मेट्रो मार्गाला जोडण्याचे नियोजन आहे. त्याबरोबरीने प्रामुख्याने पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील इतर रेल्वे स्थानकेही मेट्रो मार्गाला जोडणे शक्य आहे. पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्ग कासारवाडी, दापोडी आणि खडकी या रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरून जाणार आहे. त्यामुळे ही स्थानकेही मेट्रो मार्गाला जोडणे शक्य होऊ शकेल. पिंपरी- स्वारगेट, वनाज- रामवाडी आणि पीएमआरडीएचा हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्ग शिवाजीनगरला एकत्र येणार आहे. त्यामुळे रेल्वे मार्गाशी जवळीक नसणारा हिंजवडी, स्वारगेट, कोथरूड, भोसरी आदी भागही मेट्रो मार्गामुळे रेल्वे स्थानकांशी जोडला जाऊ शकतो.