पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीत आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ कामगारांच्या होरपळून मृत्यू झाला. काहींच्या नजरेत ही एक केवळ भीषण दुर्घटना होती, तर काहीजणांसाठी ही दुर्घटना म्हणजे आभाळ कोसळण्यासारखीच ठरली. या घटनेत कुणी आई गमावली, तर कुणी बाप… कुणाची बहीण गेली… तर कुणाच्यातरी मुलाला काळाने हिरावून घेतलं.

पुण्यातील पिरंगुट येथील केमिकल कंपनीत लागलेली आग १८ कुटुंबासाठी दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखी ठरली…! मृत्यू झालेल्या या जीवांची होरपळ मृत्यूनंतरही थांबलेली नाही. मृतदेहांची ओळख देखील नातेवाइकांना पटेना, त्यामुळे आता कामावर जाताना कोणते कपडे किंवा दागिने घातले होते या माहितीच्या आधारावरच मृतदेहांची ओळख समजू शकणार आहे. या भीषण दुर्घटनेमुळे पिरंगुट परिसरावर शोककळा पसरली आहे.

पुण्यातील मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ असलेल्या एस व्ही एस अॅक्वा या केमिकल कंपनीत आज सकाळी नेहमीप्रमाणे कामगार कामासाठी आले होते. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर अडीच वाजेच्या सुमारास सर्व काम करीत होते. त्याच वेळी कंपनीत मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला आणि क्षणार्धात मोठी आग लागली. हे पाहून त्यातील पुढील बाजूस असलेले सर्व कामगार बाहेर पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र दुसर्‍या बाजूला असलेल्या महिला कामगार चारही बाजुंनी आगीच्या विळख्यात अडकल्या होत्या. आग आणि धूर प्रचंड असल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. कंपनीतील निघणारा धूर पाहून बाजूच्या लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन, आत अडकलेल्यांची सुटका व्हावी या उद्देशाने कंपनीची भिंत जेसीबीच्या मदतीने पाडली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते आणि त्यामुळे आत अडकलेल्या महिला कामगारांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती आसपासच्या गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. यामुळे या कंपनीत काम करणार्‍या महिलांच्या नातेवाईकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली. तोवर आग काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. त्यानंतर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी साधारण तासाभरात एक एक करून असे तब्बल १८ मृतदेह बाहेर आणले. त्यानंतर ससून रुग्णालयाकडे सर्व मृतदेह रवाना करण्यात आले. मात्र हे सर्व मृतदेह एवढे जळालेल्या अवस्थेत आहेत की त्यांची ओळख होणेही अशक्य झाले आहे.

या दुर्घटनेनंतर नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा प्रचंड आक्रोश पाहण्यास मिळाला. तर तेथील काही नातेवाईकांनी सांगितले की, या कंपनीत आठ दिवसांपूर्वीच एक छोट्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली होती. तेव्हाच काळजी घेण्याची गरज होती. जर तेव्हाच काळजी घेतली गेली असती. तर आज अशी दुर्घटना घडली नसती. आमची माणसं नाहक गेली नसती. त्यामुळे मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.