माजी खासदार आणि जनता पक्षाचे नेते संभाजीराव(लाला) काकडे यांचे वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद पवारांचे राजकीय विरोधक म्हणून काकडे यांची ओळख होती.
बारामती तालुक्यातील निंबुत येथील एक वजनदार घराणे म्हणून काकडे यांचा लौकिक होता. १९६७ साली काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते. तसेच, माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या निकटच्या सहकाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखलं जायचं. मागील वर्षभरापासून काकडे हे आजारी होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा अंत्यविधी दुपारी 2:30 वाजता होणार आहे.
काकडे यांच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. “माजी खा. संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले. शोकमग्न कुटुंबीयांप्रति सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली!,” अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
माजी खा. संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले.
शोकमग्न कुटुंबीयांप्रति सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली!— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 10, 2021
बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार राहिले होते. त्याचबरोबर आमदार म्हणूनही ते निवडून आले होते. जनता पक्ष आणि समाजवादी चळचळीच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती.