इन्फोसिस फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्ड २०१८-१९’ वर यंदा पुण्याच्या अजिंक्य धारिया आणि स्वप्नील चतुर्वेदी या तरूणांनी आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. स्वप्नील चतुर्वेदी याला ‘स्मार्टलू’ बांधणी प्रकल्पासाठी गौरविण्यात आले, तर अजिंक्य धारिया याला ‘पॅडकेअर’ हे सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावणारे सयंत्र विकसित केल्याबद्दल इन्फोसिस फाउंडेशनकडून गौरवण्यात आले आहे.
वंचित गटातील व्यक्तींच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, गट आणि स्वयंसेवी संस्थांना इन्फोसिस फाउंडेशनतर्फे आरोहण सोशल इनोव्हेशन अॅवॉर्डने गौरवण्यात येते. यावर्षी सामाजिक क्षेत्रातील कामासाठी बारा जणांना एक कोटी सत्तर लाख रूपयांचे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. आरोग्य, ग्रामीण विकास, निराधारांना मदत, महिला सुरक्षितता आणि सबलीकरण, शिक्षण आणि क्रीडा या विभागांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात.
अजिंक्य धारिया या मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या तरूणाने मासिक पाळीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या सॅनिटरी पॅडची संपूर्ण विल्हेवाट लावण्यासाठी ‘पॅडकेअर’ हे सयंत्र विकसित केले आहे.
‘व्हेंचर सेंटर पुणे’ यांच्या सहकार्याने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे एनसीएलच्या ‘इनोव्हेशन सेंटर’ मध्ये अजिंक्य आणि त्याचे सहकारी या स्टार्ट अप प्रकल्पावर काम करत असून पुढील दोन ते तीन महिन्यांत हे सयंत्र बाजारात उपलब्ध होणार आहे.
अजिंक्य म्हणाला,की मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर एक वर्ष कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करण्याचा अनुभव घेतला, मात्र स्वतचे स्टार्ट अप हवे यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील होतो. प्रतिदिन काही दशलक्ष सॅनिटरी नॅपकिन वापरले जातात.
मात्र त्यातील सुमारे अठ्ठय़ाण्णव टक्के नॅपकिन थेट कचऱ्यात टाकले जातात. त्याचे दुष्परिणाम कचरा वेचकांच्या आरोग्यावर होतात. मात्र योग्य विल्हेवाट लावण्याची सोय उपलब्ध नसल्याने महिलांकडेही दुसरा पर्याय नसतो. यावर तोडगा काढण्यासाठी पॅडकेअर हे सयंत्र निर्माण करण्यात आले आहे. रासायनिक आणि यांत्रिक प्रक्रियेचा वापर करून यात पॅडची विल्हेवाट लावली जाते, त्यानंतर शिल्लक राहणारा कचरा प्रक्रिया करून पुन्हा वापरणे शक्य असल्याने त्या कचऱ्याला मोल मिळणे शक्य आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये हे सयंत्र बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार असून महिलांची वसतिगृहे, कॉर्पोरेट कार्यालये, विद्यापीठे आणि रूग्णालये येथे त्याचा योग्य वापर शक्य आहे. त्याचा आकार आटोपशीर असल्याने एका स्वच्छतागृहातही ते बसवणे शक्य आहे. विजेवर चालणारे हे उपकरण कितीही वेळा वापरणे शक्य आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या तशा प्रकारच्या यंत्रांच्या तुलनेत हे परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहे.
अजिंक्य धारिया याने विकसित केलेल्या पॅडकेअर उपकरणाला इन्फोसिस फाउंडेशनचे ‘ज्यूरी अॅवॉर्ड’ मिळाले असून त्याची चाचणी घेण्याची तयारी इन्फोसिस कडून दाखवण्यात आली आहे. स्टार्ट अप प्रकल्पाला इन्फोसिस सारख्या मोठय़ा समूहाकडून मिळालेली ही दाद कामातील उत्साह वाढवणारी असल्याचे अजिंक्यने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.