पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे (वय ४८) यांचे आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले. मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरीत रूबी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

कांबळे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले होते. त्याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना लगेचच उपचारासाठी रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मुंढवातील भिमनगर येथील त्यांच्या राहत्या घरातून आज सांयकाळी ५ वाजता निघणार आहे. कोरेगाव पार्क येथील स्मशानभुमीत अंत्यविधी होणार आहे.

मुळचे रिपाइंचे असलेले कांबळे हे नुकत्याच झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपकडून विजयी झाले होते. भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पक्षाने त्यांना उपमहापौर पदाची संधी दिली होती. ते रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घारगाव हे त्यांच मुळ गाव आहे. १९७२ च्या  दुष्काळात पुणे येथील विश्रांतवाडी येथे ते स्थायिक झाले होते. त्यांचे शालेय शिक्षण हे कोरेगाव पार्क येथील संत गाडगे महाराज विद्यालयात झाले. वाडिया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली होती. १९७७ पासून दलित पँथरमधून सामाजिक कार्यास सुरूवात केली. १९८० मध्ये ते भारतीय विद्यार्थी संसदेचे पुणे शहराध्यक्ष झाले होते. नामांतर आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता. या आंदोलनात त्यांना कारावासही भोगला होता. १९८३ ते १९८५ या कालावधीत ते दलित पँथरचे शहराध्यक्ष होते. १९९० ते १९९६ या काळात रिपाइंचे शहराध्यक्ष बनले होते. १९९७ मध्ये पहिल्यांदा नगरसेवकपदी निवडून आले. स्थायी समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. २००२ मध्ये ते दुसऱ्यांदा नगरसेवक बनले. २००५ ते २००९ या कालावधीत त्यांनी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली होती. २०१७ मध्ये तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले. १५ मार्च रोजी २०१७ रोजी त्यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली होती.

दरम्यान, नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे महापालिकेची सर्व कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले असून यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहे.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

सच्चा मित्र गमावला
राजकारणात येण्यापूर्वीपासून त्यांची माझी ओळख होती. सर्वसामान्य कुटुंबातून नवनाथ कांबळे हे राजकारणात आले होते. त्यांनी जीवनात कायम संघर्ष केला. त्यांच्या निधनामुळे एक सच्चा मित्रा गमवला.

दिलीप कांबळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हरपला
नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता हरपला असून त्यांचा नागरिकांमध्ये चांगला जनसंपर्क होता.
मुक्ता टिळक, महापौर, पुणे