नवी यंत्रणा कार्यान्वित होऊनही क्रमांक जोडणीमध्ये गोंधळ

स्वस्त अन्नधान्य दुकानांमध्ये होणारा धान्याचा अपहार आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी राज्य शासनाने शिधापत्रिकांना आधार क्रमांक जोडणे अनिवार्य केले आहे. आधारजोडणी केलेल्या लाभार्थ्यांनाच स्वस्त धान्याचा लाभ देण्यात येत आहे. तसेच स्वस्त धान्य दुकानांमध्ये ई-पॉस (पॉइंट ऑफ सेल – पीओएस) यंत्रे बसवून आधारवर आधारित सार्वजनिक वितरण व्यवस्था (आधार एनेबल्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम – एईपीडीएस) यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, अद्यापही नागरिकांच्या समस्या कायम आहेत. दरम्यान, तक्रार निवारण करण्यासाठी पुरवठा विभागाकडून मोबाईल क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची आणि अंत्योदय योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहर पुरवठा विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. एईपीडीएस यंत्रणा चालू वर्षी एप्रिल महिन्यापासून कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानंतर स्वस्त धान्य लाभार्थ्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर अद्यापही लाभार्थ्यांच्या विविध तक्रारी पुरवठा विभागाकडे दाखल होत आहेत. तसेच एईपीडीएस प्रणालीद्वारे शहरासह उर्वरित जिल्ह्यत धान्य वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे धान्याचा संभाव्य होणाऱ्या काळ्या बाजारावर अंकुश लागला आहे. दरम्यान, शहर अन्नधान्य विभागाच्या वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. या माध्यमातून तक्रारींचे निरसन केले जात आहे. मात्र, शहरापेक्षा उर्वरित जिल्ह्यतील तक्रारींचे प्रमाण अधिक आहे. शहरातून येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊ न संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत, अशी माहिती शहर पुरवठा अधिकारी आर. बी. पोटे यांनी दिली आहे.

तक्रारी नोंदवून घेण्यासाठी प्रशासनाने ७६२०३४३३२४ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. हा क्रमांक सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी  ८१ तक्रारी प्राप्त झाल्या असून आतापर्यंत साडेपाचशेपेक्षा अधिक तक्रारींची नोंद विभागाकडे झाली आहे. या तक्रारींमध्ये प्रामुख्याने धान्य मिळत नाही, दुकानदार वेळेत दुकान उघडत नाही, केशरी शिधापत्रिकाधारकाला धान्य मिळत नाही, अशा तक्रारी अधिक आहेत.

Story img Loader