वास्तुशिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या महात्मा फुले मंडईच्या छताची दुरुस्ती गतीने सुरू आहे. 24mandai2महापालिकेने हेरिटेज वास्तूचा दर्जा दिलेल्या मंडईच्या छतावर असलेल्या त्यावेळी फ्रान्समधून आणण्यात आलेल्या मूळ कौलांपैकी ८० टक्के हेरिहेज कौले पुन्हा वापरण्यात आली आहेत. उर्वरित २० टक्के कौले ही स्पेनवरून आयात करण्यात आली आहेत.
मंडईची सध्याची वास्तू ही सव्वाशे वर्षांपूर्वी अस्तित्वामध्ये आली. मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर १८८८ रोजी या वास्तूचे उद्घाटन झाले होते. त्यामुळे या वास्तूला ‘रे मार्केट’ असे संबोधिले जात होते. उपखंडीय हवामानाची स्थिती ध्यानात घेऊन वासुदेव कानिटकर या वास्तुविशारदाने आठ पाकळ्या असलेल्या या अनोख्या वास्तूची निर्मिती केली. याच वास्तूमध्ये महात्मा फुले संग्रहालय सुरू झाले आणि पुणे नगरपालिकेची सर्वसाधारण सभाही येथे भरत असे. १९३८ मध्ये आचार्य अत्रे पुणे नगरपालिकेचे सभासद असताना त्यांनी या मंडईचे ‘महात्मा फुले मंडई’ असे नामकरण केले.
मंडईच्या छतावर असलेली कौले ही त्याकाळी फ्रान्समधून आयात करण्यात आली होती. या कौलांची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे नाव प्रत्येक कौलावर ठळकपणाने दिसते. मंडईच्या स्थापनेपासून ही कौले आतापर्यंत मजबूत होती. मात्र, काळाच्या ओघात काही कौले फुटली तर, काही कौले  नादुरुस्त झाली. त्यामुळे हेरिटेज वास्तू असलेल्या मंडईच्या कौलांच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपासून हे काम सुरू आहे. मूळ कौलांपैकी ८० टक्के कौले ही स्वच्छ धुवून आणि रासायनिक आवरण लावून पुन्हा वापरण्यात आली आहेत. मात्र, या वास्तुचे सौंदर्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मूळ कौलांप्रमाणेच असलेली कौले ही स्पेन येथून आयात करण्यात आली आहेत. गेल्या सव्वाशे वर्षांतील ही पहिलीच मोठी दुरुस्ती असल्याने वेळ लागत असला तरी छताच्या दुरुस्ती कामाने आता गती घेतली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

अशी झाली मंडई
मंडईची वास्तू साकारण्यापूर्वी शनिवारवाडा प्रांगणात उघडय़ावरच पुण्याची मंडई भरत होती. तेथेच धान्य, फळे-भाजीपाला आणि मांस याची विक्री होत असे. मात्र, त्यावेळी शनिवारवाडा परिसरात राहणाऱ्या नागिरकांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्याने मंडईच्या स्थलांतराचे आदेश काढले. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले यांनी त्याला विरोध केला होता. ज्या भाजी विक्रेत्यांनी विरोध केला त्यांना चोपून काढण्यात आले होते. मात्र, त्यानंतर मंडई शुक्रवार पेठेमध्ये स्थलांतरित झाली. त्या काळामध्ये मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटनंतर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मंडई होती. ब्रिटिश कोलोनियल आर्किटेक्चर असा या वास्तूचा लौकिक असल्याची माहिती इतिहासाचे अभ्यासक प्रा. गणेश राऊत यांनी दिली.