पिंपरी प्राधिकरणाचा निर्णय; वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्पात घरे

वाल्हेकरवाडी येथील चिंचवड जुना जकात नाका ते रावेत दरम्यान होणाऱ्या ३४ मीटर रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना प्राधिकरण वाल्हेकरवाडीतील गृहप्रकल्पात थेट पध्दतीने सदनिका देणार आहे. प्राधिकरणाच्या या निर्णयामुळे रस्ताबाधित पात्र रहिवाशांना त्याचा फायदा होणार आहे. या रस्त्याचे काम महापालिकेतर्फे केले जाणार आहे.

प्राधिकरणाकडून चिंचवड जुना जकात नाका ते रावेत दरम्यानचा ३४ मीटरचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या रस्त्यातील काही भाग महापालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे प्राधिकरणाने हा रस्ता विकसित करण्यासाठी महापालिकेला दहा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ३४ मीटर रस्त्यावर काही रहिवाशांनी अतिक्रमणे केली होती. त्यातील ७० रहिवाशांच्या अतिक्रमणांवर प्राधिकरणाने नुकतीच कारवाई केली. त्यामुळे ३४ मीटर रस्ता रुंदीकरणाची जागा रस्ता विकसित करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. ७० रहिवाशांमधील पात्र लाभार्थीना पेठ क्रमांक ३० आणि ३२ वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्पामध्ये थेट पध्दतीने सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा रहिवाशांना होणार असल्यामुळे प्राधिकरणाच्या अतिक्रमण कारवाईला त्यांनी विरोध केला नव्हता.

पेठ क्रमांक ३० आणि ३२ मधील गृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. सुरुवातीच्या काळात गृहप्रकल्पाचे काम घेतलेल्या एलोरा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून कामाचा वेग कमी झाला होता. त्यामुळे प्राधिकरण प्रशासनाने ठेकेदार कंपनीला दरदिवशी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड ठेकेदाराच्या बिलातून कापून घेतला जाणार आहे. या कारवाईनंतर ठेकेदाराने कामाचा वेग वाढविला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना घराचा ताबा वर्षभरामध्ये मिळण्याची शक्यता आहे. वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्पामध्ये ७९२ सदनिका आहेत. ३४ मीटर रस्त्याचे कामही पावसाळ्याच्या आधी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Story img Loader