निवारा नसलेल्या नागरिकांच्या समस्या आपल्याकडे नेहमीच चर्चेचा मुद्दा असतो. अशा नागरिकांना मुलभूत गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कामही करत असतात. अनेकदा या संस्था प्रकाशझोतात येत नाहीत. मात्र, तरीही या संस्थांकडून निस्पृह वृत्तीने आपले काम अविरतपणे सुरूच असते. आळंदीतील रॉबिनहूड आर्मीदेखील यापैकीच एक. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ही संस्था सुरू केली होती. गेल्या दीड वर्षांपासून ही संस्था आळंदीत प्रत्येक शुक्रवारी गरिबांना नियमितपणे अन्नदान करत आहे. या संस्थेत तब्बल ५० हून अधिक विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी आळंदीच्या एम.आय.टी.महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. यंदा ख्रिसमसला रॉबिनहूड आर्मीने अन्नदानाबरोबरच आणखी एक नवा उपक्रम राबवला. यावेळी संस्थेकडून येथील ८०० बेघर नागरिकांना चादर, शाल, जीन्स, शर्ट, साडी अशा कपड्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी हे कपडे स्थानिक परिसर, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन गोळा केले होते. रॉबिनहूड आर्मीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एम.आय.टी.महाविद्यालयातील विद्यार्थी इंद्रायणीच्या काठावर अनेकदा फिरण्यासाठी येत. त्यावेळी अनेक बेघर नागरिक त्यांच्या दृष्टीस पडायचे. या नागरिकांच्या समस्या पाहून विद्यार्थ्यांना नेहमीच हळहळ वाटायची. अखेर या विद्यार्थ्यांनी आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून या लोकांना मदत करायची ठरवले. त्यासाठी या विद्यार्थ्यांनी भोसरी, मोशी, दिघी, विश्रांतवाडी येथील स्थानिक नागरिकांशी संपर्क साधला. या माध्यमातून ‘रोटीबँक’ सुरू करण्यात आली. आज ही ‘रोटीबँक’ अनेक बेघर नागरिकांची भूक भागवत आहे. अनेक नागरिक आणि हॉटेल मालक या विद्यार्थ्यांशी स्वतः हा फोनवर बोलवून अन्नदान करत आहेत.कचऱ्यात जाणारे अन्न हे गरीबाच्या पोटात जात आहे, याच समाधान त्यांना लाभत आहे.

Story img Loader