श्रीमंत महापालिका अशी ओळख असणारी पिंपरी चिंचवड महापालिका सध्या एका वेगळ्या विषयाने चर्चेत आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका व उद्यान विभागाच्या वतीने २४ वे फुले, फळे, भाज्या, बागा, वृक्षारोपण यांविषयीच्या स्पर्धा आणि प्रदर्शन निगडी प्राधिकरण येथे आयोजित केले आहे. मात्र या प्रदर्शनात एक अजब गोष्ट करण्यात आली आहे. ती म्हणजे प्रदर्शनात बियरच्या बाटलीत गुलाब आणि इतर फुले ठेवण्यात आली आहेत. आता या बाटल्यांचा टाकाऊतून टिकाऊ असा वापर कऱण्यात आला असला तरीही किमान त्या बाटल्यांवरील बियरची जाहिरात तरी काढणे आवश्यक आहे. मात्र असे न करता थेट कंपनीच्या लेबलसह या बाटल्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमध्ये बाटल्यांविषयी चर्चा रंगल्याचे चित्र आहे.
गुरुवारी महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन शुक्रवारी २३ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले. मात्र या प्रकारामुळे लहान मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यात चुकीचा संदेश जात आहे. महानगर पालिका बियरची जाहिरात करत नाही ना?असा प्रश्नही या प्रदर्शनानंतर उपस्थित केला आहे. प्रदर्शनात वृक्षारोपण, परसातील बाग, शोभिवंत पाना-फुलांच्या कुंड्या, फुले व त्यांची मांडणी अशा विविध स्पर्धा महापालिकेच्या वतीने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे एकीकडे चांगले काम करत असताना असे का केले असा प्रश्नही निर्माण झाला आहे. याविषयी महापौर नितीन काळजे यांच्याशी लोकसत्ता ऑनलाइन ने संपर्क केला असता या बियरच्या बाटल्या भंगारातून आणल्या असतील. याचा कोणीही गैरअर्थ काढू नये असं सांगितलं.