अवघ्या तीनशे रुपयांत यंत्रणा विकसित

पुणे : पीएमपीच्या गाडय़ांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये निर्जंतुकीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सध्या पीएमपीच्या तेरा आगारांतील प्रत्येकी एका गाडीत ही यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्यात आली आहे. सोडियम हायपोक्लोराइड या द्रावणाचा वापर करून एका गाडीसाठी अवघ्या तीनशे रुपयांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे.

पीएमपीकडून सध्या प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असून सध्या अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य सेवा पुरविली जात आहे.  महापालिका आणि अन्य शासकीय यंत्रणातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीकडून उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या गाडय़ा मार्गावर आणण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. गाडय़ा सुटणाऱ्या स्थानक परिसरात औषध फवारणी करण्यात येत असून गाडय़ातील आसन व्यवस्थाही दैनंदिन स्वच्छ के ली जात आहे. गाडय़ा मार्गावर सोडण्यापूर्वी आगारात त्यांचे प्रथम निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्या अंतर्गत गाडीमध्येच निर्जंतुकीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. अवघ्या तीनशे रुपयांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

पीएमपीच्या गाडीतील दोन्ही दरवाजांमधून प्रवासी आत आल्यावर आणि गाडीतून उतरताना प्रवाशाच्या अंगावर सोडियम हायपोक्लोराइड या द्रावणाची फवारणी होते. गाडी सुरू असतानाही ही फवारणी सुरूच राहत आहे. मात्र द्रावण फवारणीचा वेग कमी असल्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणताही धोका नाही. द्रावणाच्या फवारणीसाठी दोन्ही दरवाजांमध्ये स्प्रिंकलर बसविण्यात आले आहेत, अशी माहिती पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली. कात्रज आगाराने गाडीमध्ये कार्यान्वित के लेली या यंत्रणेची चलचित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित होत आहे. कात्रज आगाराबरोबरच पीएमपीच्या अन्य बारा आगारांमधील प्रत्येकी एका गाडीत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्याला प्रवाशांचा प्रतिसादही मिळत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह, या दोन्ही शहरांतील रुग्णालये, महावितरण, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या सेवा देणाऱ्या यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांसाठी पीएमपीकडून सेवा पुरविण्यात येत आहे. दररोज साधारपणे १२० गाडय़ांद्वारे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सुमारे पन्नास मार्गावर ही सेवा सुरू आहे. सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत स्वारगेट, कात्रज, डेक्कन, पुणे महापालिका भवन, पुणे रेल्वे स्थानक, मोलेदिना, हडपसर गाडीतळ, पिंपळेगुरव, निगडी, आकुर्डी रेल्वे स्थानक, चिंचवडगांव, भोसरी, पिंपरीगांव आदी २७ स्थानकांवरून या गाडय़ा सोडल्या जात आहेत.

Story img Loader