मानवी जीवनातील वेदना शब्दबद्ध करणारे ज्येष्ठ गझलकार इलाही जमादार (वय ७४) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. कविवर्य सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलेला शिखरावर नेणारे प्रसिद्ध गझलकार अशी त्यांची ख्याती होती.
पत्नी आणि मुलाच्या निधनानंतर इलाही जमादार पुण्यात एका छोटय़ा खोलीमध्ये एकटेच राहत होते. टाळेबंदीच्या काळात जुलैमध्ये ते तोल जाऊन पडले, त्या वेळी त्यांना जबर मार लागला होता. त्यातच वाढत्या वयामुळे त्यांना स्मृतिभ्रंशाचा त्रासही सुरू झाला होता. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. जमादार यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
जमादार हे पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे आवडते गझलकार होते. तीन वर्षांपूर्वी त्यांनी इलाही यांचा पत्ता शोधून त्यांची भेट घेतली होती. प्रकृती ठीक नाही हे जाणवल्यानंतर त्यांनी इलाही यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. डॉ. धनंजय केळकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी इलाही यांची सेवा केली. डॉ. केळकर यांच्या हस्ते इलाही यांच्या ‘दोहे इलाहींचे खंड १ व २’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले होते. पंडितजींनी इलाही यांना दरमहा ‘कृतज्ञता निधी’ गेले कित्येक महिने सुरू ठेवला होता.
* जमादार यांचा जन्म १ मार्च १९४६ रोजी सांगलीतील दुधगाव येथे झाला. वयाच्या १८ व्या वर्षीपासून त्यांनी काव्यलेखन सुरू केले. आकाशवाणी, दूरदर्शनवर कार्यक्रम करणाऱ्या इलाही यांनी मराठी, हिंदी, उर्दू भाषेमध्ये कविता व गझललेखन केले. नवोदित कवींसाठी ‘इलाही गझल क्लिनिक’ या नावाने ते कार्यशाळा घेत असत.
* त्यांच्या मराठी काव्यरचना ‘मराठी सुगम संगीत’आणि ‘स्वरचित्र’ या कार्यक्रमांतून सादर झाल्या होत्या. ‘जखमा अशा सुगंधी’, ‘भावनांची वादळे’, ‘दोहे इलाहीचे’, ‘मुक्तक’, ‘अनुराग’, ‘अनुष्का’, ‘अभिसारिका’ आणि ‘गुंफण’ हे त्यांचे कविता आणि गझलसंग्रह प्रसिद्ध आहेत.
१९८३ ला झालेली आमची मैत्री कौटुंबिक नात्यात कधी बदलली हे कळले नाही. गझलकार संगीता जोशी यांच्या घरी इलाही आणि माझी भेट झाली. त्यावेळी इलाही यांनी माझ्या हाती सोपवलेल्या ओळी होत्या, ‘अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा.’ पुढे या गझलेने मला आणि इलाही आम्हा दोघांनाही ओळख दिली. इलाही यांनी मला आणखी एक गझल दिली होती. ती मी स्वरबद्ध केली, पण अद्याप कुठेही गायली नाही, कदाचित पुढेही गाणार नाही. त्या गझलेच्या ओळी होत्या, ‘या क्षितिजाच्या पल्याड निघूनी जावे म्हणतो..’ आज ते गेल्याचे कळले आणि या ओळी डोळ्यांपुढे येऊ लागल्या.
– भीमराव पांचाळे, गझलकार
एक ओळ ऊर्दू आणि दुसरी ओळ मराठी असे नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी केले. ‘ए सनम तू आज मुझको खुबसूरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या तू मला आवाज दे’ ही गझल त्याचे उदाहरण. ‘सांजवेळी सोबतीला सावली देऊन जा..’ आणि ‘जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, केलेत वार ज्याने तो मोगरा असावा’ या त्यांच्या गझल लोकप्रिय आहेत.
– रमण रणदिवे, गझलकार