पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप केले आहेत. यामुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे. देवरे यांनी ऑडिओ क्लिपमध्ये वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचाही उल्लेख केलेला आहे. दरम्यान, या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी माहिती काढलेली असून मी स्वतः त्यांच्या संपर्कात आहे. ज्यावेळी कोणत्याही महिलेचा विषय येतो तेव्हा आपण सर्वांनी संवेदनशीलपणे विचार केला गेला पाहिजे. एखादी क्लिप आली म्हणजे समज गैरसमज होतात. त्यामुळे त्या महिलेची प्रायव्हसी देखील जपली पाहिजे. आम्ही त्यात स्वतः जातीने लक्ष घालत आहोत, त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वासू ठेवू नये, एवढच मी सांगू शकते.”
निलेश लंकेंवर चित्रा वाघ यांची आगपाखड
या प्रकरणामुळे भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर हल्ला चढवला होता.आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमधून संताप व्यक्त करत चित्रा वाघ म्हणाल्या, “सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होत आहे का तेच आता पाहायचंय.”
“तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की, मीही तुझ्याकडे लवकरच येत आहे. त्यात त्यांनी प्रशासनाकडून कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसे त्रास देतात, वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचं दाहक वास्तव त्यांनी उभं केलं आहे. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही दिसत आहेत आणि हीच माझी सुसाईड नोट समजा असंही त्यांनी त्या क्लिपमध्ये म्हटलं आहे. खरं तर सुसाईड नोटमध्ये सगळ्यांची नावं लिहून ठेवायची आणि कोर्टात ती खोटी ठरली तर? हिरा बनसोडेसारखं फिर्याद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे”, असं वाघ यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.