मराठी चित्रपटसृष्टीत ‘हिरो’ होऊ, असे कधीही वाटले नव्हते. चित्रपट व नाटकांमध्ये काम करत गेलो, ते प्रेक्षकांना आवडले. मी हिरो नाही, कलाकार आहे. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे नायकत्व मिळाले. १४ वर्षांच्या वाटचालीत आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला, तो संघर्ष नसता तर आजचा सिद्धार्थ घडला नसता, अशा भावना अभिनेते सिद्धार्थ जाधवने पिंपरीत व्यक्त केल्या.
‘रझाकार’ चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी पिंपरीत आलेल्या सिद्धार्थने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, वाईट अनुभव पुढच्या आयुष्याचे शिक्षक असतात, हे १४ वर्षांनंतर जाणवले. सुरूवातीच्या काळात आपले दात, चेहरा, रंगावरून टिप्पणी व्हायची, ती मनावर घेतली नाही, स्वत:मध्ये सुधारणा केल्या. अभिनय हेच शक्तिस्थान बनवले. बलस्थाने ओळखून त्यावर लक्ष केंद्रित केले. स्वत:वर प्रेम करायला लागलो. १२ वर्षे झोपडपट्टीत काढली. संघर्ष नसता तर आजचा सिध्दार्थ घडला नसता. अभिनेता म्हणून वेगळेपणा जपतानाच प्रेक्षकांना ‘सरप्राईज’ द्यायला आवडते. फक्त विनोदी भूमिका न करता आव्हानात्मक भूमिका केल्या. ‘दे धक्का’तील धनाजी, ‘मी शिवाजीराजे’तील उस्मान पारकर, ‘लालबाग परळ’मधील ‘स्पीडब्रेकर’, ‘पारध’मधील कार्यकर्ता, ‘जत्रा’तील सिद्धू अशा विविध भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. ‘रझाकार’ मधील हरीची भूमिका तितक्याच ताकदीची असून त्यातील सिद्धार्थ पूर्णपणे वेगळा असून कारकिर्दीत अशी आव्हानात्मक भूमिका मिळाली नाही. काळजाला हात घालणारा विषय असून महाराष्ट्राच्या मातीच्या भावना त्यात आहेत. ज्यांना मी आवडतो, त्यांच्यासाठी अधिक वेळ देतो. मात्र, ज्यांना मी आवडत नाही, त्यांनी आपल्याला आवडून घ्यावे, यासाठी वेळ वाया घालवत नाही, अशी टिप्पणी सिद्धार्थने या वेळी केली. या वेळी लेखक-दिग्दर्शक राज दुर्गे, अभिनेत्री पीयूषा कोलते, गौतम पाटील, सोमनाथ लिबरकर उपस्थित होते.
‘हिरो होऊ, असे कधीच वाटले नव्हते संघर्ष नसता तर सिद्धार्थ जाधव घडला नसता’
‘रझाकार’ मधील हरीची भूमिका तितक्याच ताकदीची असून त्यातील सिद्धार्थ पूर्णपणे वेगळा असून कारकिर्दीत अशी आव्हानात्मक भूमिका मिळाली नाही.
First published on: 23-02-2015 at 03:00 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddhartha jadhav in pimpri for publicity of razakar