पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ६ कोटी ५२ लाख ५४ हजारांचे रक्तचंदन जप्त केले आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी केली असून ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच्या मोबाईलमध्ये रक्तचंदनाचे फोटो व्हाट्स अ‍ॅपवर शेअर केल्याचं आढळलं असल्याने प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी निलेश विलास ढेरंगे, एम.ए सलीम, विनोद प्रकाश फर्नाडीस यांच्यासह एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड हद्दीत एक मोटार संशयितरित्या थांबली होती. तेव्हा, पोलिसांनी तेथील व्यक्तींना हटकले असता त्यापैकी पाठीमागे थांबलेले काही जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यानंतर, इतर पाच जणांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस करण्यात आली. तेव्हा, आरोपी निलेश ढेरेंगेच्या मोबाईलमधील व्हाट्सऍपमध्ये रक्तचंदनाने भरलेल्या ट्रकचे फोटो शेअर केल्याचं पोलिसांना दिसले.

अधिक तपास केला असता रक्तचंदनाने भरलेला ट्रक ताथवडे येथे आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. सापडलेल्या ट्रकमध्ये ६.४२० टन वजनाचे लाकडी रक्तचंदनाचे ओंडके आढळले. आरोपीकडून तब्बल ६ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप, चोरून आणलेले रक्तचंदन कोठून आणलं आणि कोठे घेऊन जात होते हे तपासात उघड झाले नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.