राहुल जाधव यांचा खडतर प्रवास

पिंपरी : मूळचे शेतकरी असलेले राहुल जाधव यांचा सहाआसनी रिक्षाचालक ते राजकारण प्रवेश, मनसेचे कार्य, नगरसेवकपद आणि आमदार महेश लांडगे यांच्याशी आलेला संपर्क, त्यांच्या माध्यमातून झालेला भाजप प्रवेश ते पुन्हा नगरसेवक असा खडतर प्रवास पूर्ण झाला आहे. शनिवारी (४ ऑगस्ट) ते पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदावर विराजमान होणार आहेत.

राहुल गुलाब जाधव (वय ३६) यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते उदरनिर्वाहासाठी सहाआसनी रिक्षा चालवत होते. १९९७ ते २००२ या पाच वर्षांत त्यांनी चिखली, भोसरी, मोशी परिसरात रिक्षा चालवली. २००२ मध्ये रिक्षा बंद करून त्यांनी शेती सुरू केली. अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने खासगी कंपनीत चालक म्हणून नोकरी स्वीकारली. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली, तेव्हा मनसेत प्रवेश केला. मनसेच्या माध्यमातून नागरी प्रश्नांवर विविध आंदोलने केली, त्याची दखल घेत मनसेने २०१२ च्या निवडणुकीत उमेदवारी दिली. जनसंपर्क आणि केलेली कामे उपयोगी पडल्याने ते निवडून आले. २०१४ मध्ये महेश लांडगे स्थायी समिती अध्यक्ष असताना जाधव यांच्या प्रभागासाठी बराच विकासनिधी त्यांनी उपलब्ध करून दिला, त्यातून बरीच कामे मार्गी लागली. जेव्हा लांडगे विधानसभेच्या रिंगणात अपक्ष उतरले, तेव्हा मनसेचा उमेदवार असतानाही जाधव यांनी लांडगे यांचा उघड प्रचार केला. आमदार झालेले लांडगे भाजपमध्ये गेले, तेव्हा जाधवही त्यांच्यासोबत गेले. २०१७ च्या पालिका निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिल्यानंतर जाधव हे चिखली-जाधववाडी-मोशी प्रभागात संपूर्ण पॅनेलसह निवडून आले. पहिल्या वर्षी महापौरपदासाठी ते स्पर्धेत होते. तेथे डावलण्यात आल्यानंतर त्यांना स्थायी समितीत घेण्यात आले. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत राहूनही त्यांना संधी मिळाली नाही. दोन वेळा हुलकावणी मिळाल्याने जाधव नाराज आणि सावधही होते. अखेर, महेश लांडगे यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केल्याने जाधव यांची यंदाच्या महापौरपदी वर्णी लागली.

शनिवारी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. या निमित्ताने आमदार लांडगे समर्थकांकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.

बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न

पिंपरीच्या महापौर-उपमहापौरपदासाठी शनिवारी निवडणूक होणार आहे. महापौरपदासाठी भाजपकडून राहुल जाधव आणि राष्ट्रवादीकडून विनोद नढे यांचा तर उपमहापौरपदासाठी भाजपकडून सचिन चिंचवडे आणि राष्ट्रवादीकडून विनया तापकीर यांचे अर्ज आहेत. पालिकेत भाजपचे निर्विवाद बहुमत असल्याने दोन्ही ठिकाणी भाजपचा विजय निश्चित आहे. बिनविरोध निवडीसाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास प्राधान्य दिले जाईल. रिक्षाचालकांचे सर्व प्रश्न माहिती असल्याने त्याची सोडवणूक करणार. महेश लांडगे हे राजकीय दैवत असून महापौरपदाची संधी हा आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा काळ आहे.

– राहुल जाधव, नियोजित महापौर, पिंपरी-चिंचवड

Story img Loader