पिंपरीच्या महापौर निवडीवरून सत्तारूढ भाजपमध्ये झालेले राजकारण, खरे ओबीसी आणि खोटे ओबीसी यांच्यातील वाद, त्यातून माळी समाजाला मिळालेली संधी, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे अधिकारी कोंडून टाकण्याचे आंदोलन, त्यावरून भाजप-राष्ट्रवादीतील संघर्ष आणि महापौर निवडणुकीच्या दिवशीच भाजप कार्यकर्त्यांनी घातलेला धुडगूस अशा घडामोडींमुळे सरत्या आठवडय़ात शहरातील राजकारण ढवळून निघाले.
पहिल्या वर्षी महापौरपद आणि त्यानंतर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची हुलकावणी मिळालेले भाजपचे नगरसेवक राहुल जाधव यांची बऱ्याच नाटय़मय घडामोडींनंतर शहराच्या महापौरपदी वर्णी लागली. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. कुणबी-मराठा असलेल्या नितीन काळजे यांना पहिल्या वर्षी ओबीसी प्रवर्गातील महापौरपद देण्यात आल्याने समस्त माळी तसेच ओबीसी समाजात नाराजी होती. निवडणुकीच्या तोंडावर विघ्न नको म्हणून ती नाराजी दूर करण्यासाठी यंदा माळी समाजाचे राहुल जाधव यांना जाणीवपूर्वक संधी देण्यात आली. स्थानिक चिंचवडे घराण्यातील सचिन चिंचवडे यांना उपमहापौरपद देत भाजप नेत्यांनी समतोल साधला. चिंचवडे हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. महापौरपदासाठी नामदेव ढाके आणि शत्रुघ्न काटे यांचीही नावे स्पर्धेत होती. मात्र, स्थानिक नेतृत्व अनुकूल न राहिल्याने ते स्पर्धेत टिकू शकले नाहीत. जगताप गटाच्या ममता गायकवाड यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागली, तेव्हाच काटे यांच्या महापौरपदाच्या दाव्यातील हवा निघून गेली होती. भाजपचे जुने कार्यकर्ते असूनही ढाके यांचा दुसऱ्यांदा विचार झाला नाही. पक्षनेते एकनाथ पवार यांनी त्यांच्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले. ढाके, काटे यांना डावलण्यात आल्याने पक्षात एकीकडे नाराजी पसरली होती. त्याच वेळी, दबावतंत्र यशस्वी झाल्याने भोसरीपट्टय़ातील नगरसेवक व कार्यकर्ते आनंदात होते. हा आनंद निवडणुकीच्या दिवशी नको त्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शंभरहून अधिक पोती भंडारा उधळल्याने महापालिका मुख्यालयाला जेजुरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे रूपांतर उन्मादात झाले. त्यावरून चौफेर टीका झाली. नवनिर्वाचित महापौरांना पहिल्याच दिवशी माफी मागावी लागली.
महापालिकेच्या राजकारणात विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सध्या आंदोलनांचा सपाटाच लावलेला आहे. शहराच्या विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून साने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या ११ नगरसेवकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचे आंदोलन केले. त्यावरून बरीच टीका झाली. भाजप नेत्यांच्या सूचनेवरून जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचे कारण देत पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल केला. तेच कारण देत राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर भंडारा उधळणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजप-राष्ट्रवादीत सध्या संघर्ष सुरू आहे. महापौर आणि विरोधी पक्षनेते एकाच चिखली भागातील असल्याने आगामी काळात त्यांच्यात पर्यायाने भाजप-राष्ट्रवादीतील संघर्ष पदोपदी जाणवणार आहे.
वर्चस्वाचा वाद की परस्पर सामंजस्य
आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पिंपरी महापालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडून खेचून आणली, तेव्हापासून दोघे सर्वार्थाने महापालिकेचे राजकारण हाताळू लागले आहेत. पहिल्या वर्षी लांडगे समर्थक नितीन काळजे यांना महापौरपद व जगताप समर्थक सीमा सावळे यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले. सावळे यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा जगताप समर्थक ममता विनायक गायकवाड यांना स्थायी अध्यक्षपदाची संधी देण्यात आली, तेव्हा लांडगे गटाला धक्का बसला. त्याच वेळी, पुढील महापौरपद आपल्याकडे खेचून आणण्याची व्यूहरचना लांडगे गटाने केली. आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रहच धरल्याने सलग दुसऱ्यांदा भोसरी मतदारसंघाला महापौरपद मिळाले. मात्र, यंदाच्या घडामोडीत नेहमीप्रमाणे दिसतो तसा दोन्ही आमदारांमध्ये सुप्त अथवा उघड संघर्ष दिसला नाही. त्यामुळे वर्चस्वाचा वाद असणाऱ्या आमदारांमध्ये या वेळी परस्पर सामंजस्य असावे, अशी शक्यता व्यक्त केली जाते.