पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर १० मे ते १७ मे पर्यंत कन्टेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउनची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केल्या. तसेच शहरातील ज्या भागात करोनाबाधित रुग्ण अधिक आहेत तिथून कोणालाही बाहेर जाऊ देण्यात येऊ नये. त्याच बरोबर राज्य राखीव पोलीस दलाची मदत घ्यायची असेल तर ती मदत उपलब्ध करुन दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल बैठक पार पडली. त्यावेळी अजित पवार हे बोलत होते. या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत अजित पवार म्हणाले की, मुंबई पाठोपाठ पुणे हे महत्त्वाचे शहर आहे. या दोन्ही शहरातील करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, आरोग्य विभाग या सर्वांनी समन्वय राखून आपापली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. करोना विषाणूंचा संसर्ग रोखण्याबरोबरच खरीप हंगामाचीही जबाबदारी जिल्हा प्रशासनावर येणार आहे. यामध्ये योग्य तो समन्वय राखून नियोजनबध्द काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच ते पुढे म्हणाले की, इतर राज्यातील जे मजूर आपापल्या राज्यात जाऊ इच्छित असतील, अशा नागरिकांना रेल्वेने पाठविण्याचे नियोजन करण्यात यावे. तसेच या मजुरांच्या प्रवासाचा खर्च राज्य शासन किंवा सीएसआर फंडातून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.